सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): ऐतिहासिक सातारा नगरीत आपणा सर्वांचा स्वाभिमान असलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य स्मारक नाही याची उणिव भासत होती. या करीता आम्ही शासनाकडे जरुर तो पाठपुरावा केला तसेच या नियोजित स्मारकाच्या दैनंदिन देखभाल व निगा राखण्यासाठी स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज स्मारक प्रतिष्ठान, सातारा या नावाने रितसर नोंदणीकृत संस्था स्थापन करण्यात आली आहे. विशेष म्हणजे संस्थेचे नोंदणी पत्र प्राप्त झाले, त्याच दरम्यान राज्य शासनाने या स्मारकासाठी रुपये २ कोटींचा पहिल्या टप्प्यातील निधीदेखील मंजूर झाला ही अत्यानंदाची बाब आहे, अशी माहीती खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली.
प्रसिद्धी पत्रकात श्री.छ. उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे की,स्वराज्याचे दुसरे छत्रपती आणि आपणा सर्वांचे जाजल्य स्फूर्तीदायी व्यक्तीमत्व म्हणून छत्रपती संभाजी महाराज यांना उभा देश ओळखतो. साता-यामध्ये त्यांनी त्याकाळी केलेल्या अवर्णनीय बाबी खुप मोठया संख्येने आहेत. असे असूनसुध्दा छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक साता-यामध्ये नाही, याची उणिव आमच्यासह सर्वानाच भासत होती. ऐतिहासिक व्यक्तीचे स्मारक होण्यासाठी अनेक कसरती कराव्या लागत आहेत. तरीसुध्दा काहीही झाले तरी छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य स्मारक साताऱ्यामध्ये सर्वांच्या सहकार्याने आणि सहभागातुन उभे करण्याचा आम्ही संकल्प सोडला होता. त्यादृष्टीने राज्य शासनाकडे आम्ही वेळोवेळी पाठपुरावा केला आणि चालु आहे.
या उपक्रमासाठी प्रथम सातारा शहरातील सर्वसमावेश व्यक्तींचा सहभाग असलेली एक संस्था “स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज स्मारक प्रतिष्ठान, सातारा” या नावाने आम्ही स्थापन केली. यामध्ये जेष्ठ पत्रकार आणि मार्गदर्शक हरिष पाटणे यांना उपाध्यक्ष तसेच गोडोलीचे विलासनाना शिंदे यांची सचिव म्हणून सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली आहे. सर्वांचा आग्रह झाल्यामुळे संस्थेचे अध्यक्षपद आम्ही स्विकारले आहे. या संस्थेमध्ये सर्वश्री दत्तात्रय बनकर, जेष्ठ पत्रकार शरद काटकर, पत्रकार संघाचे शहराध्यक्ष विनोद कुलकर्णी, माजी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, माजी नगरसेवक वसंत लेवे, माजी पं.स.सदस्य संजय पाटील, माजी उपनगराध्यक्ष किशोरतात्या शिंदे, संग्राम बर्गे, अमित कुलकर्णी, अभिजीत बारटक्के, ईशाद बागवान, सुजित जाधव, सचिन साळुंखे, अमोलभाऊ तांगडे यांचा समावेश आहे.
छत्रपती संभाजी महाराज यांचा त्यांच्या लौकिकास शोभुन दिसेल असा पुतळा आणि स्मारक उभारणी करताना तसेच त्यानंतर त्याची निगा राखण्यासाठी या प्रतिष्ठानच्या माध्यमातुन सूचना प्रस्तावित केल्या जाणार आहेत. स्मारकाचे संपूर्ण काम सातारा नगरपरिषदेच्या माध्यमातुन होणार आहे. त्यासाठी नुकताच रुपये २ कोटींचा पहिला टप्यातील निधी नगरपरिषदेस प्राप्त झाला आहे. यासाठी लागेल तितका निधी मंजूर केला जाणार आहे.
लवकरच प्रतिष्ठानची बैठक बोलावण्यात येणार आहे. त्या बैठकीत विशेष निमंत्रितांनाही बोलावण्यात येणार आहे. या स्मारकाचा आराखडा, नकाशा तसेच अन्य बाबींविषयी या बैठकीत विचारविमर्श करण्यात येणार असून, त्याप्रमाणे पुढील कार्यवाही नगरपरिषदेच्या माध्यमातून करण्यात येईल, असेही खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी शेवटी पत्रकात नमूद केले आहे.
You must be logged in to post a comment.