शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचा साताऱ्यात मोर्चा

मानधन थकबाकीसाठी आंदोलन; विविध मागण्यांसाठी प्रशासनाला निवेदन

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेच्या (आयटक) वतीने गेल्या चार महिन्यांपासून थकीत असलेल्या मानधनाच्या मागणीसाठी साताऱ्यात मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषदेच्या मुख्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी आपला संताप व्यक्त केला. नियोजित ‘भीक माँगो’ आंदोलन रद्द करत संघटनेने मोर्चाद्वारे जोरदार मागण्या मांडल्या आणि जिल्हा प्रशासन तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांना निवेदन सादर केले.

या मोर्चाची सुरुवात पोवईनाका येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून झाली. कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषदेपर्यंत रस्त्याने मोर्चा काढला. विविध मागण्यांच्या घोषणा देत कर्मचाऱ्यांनी आपली नाराजी स्पष्ट केली.

थकीत मानधनाची तातडीने मागणी

संघटनेच्या म्हणण्यानुसार, शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचे मानधन गेल्या चार महिन्यांपासून थकीत आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाने हे मानधन तात्काळ मंजूर करून अडचणीत सापडलेल्या कर्मचाऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी संघटनेने केली.

संघटनेच्या प्रमुख मागण्या

१) किमान वेतन २४ हजार रुपये लागू करावे.

२) वेतन लागू होईपर्यंत १० हजार रुपये मानधन तात्पुरते द्यावे.

३) सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे १२ महिने नियमित मानधन मिळावे.

४) शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा.

५) अन्यायाने कमी केलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेत मानधन देण्यात यावे.

संघटनेचा इशारा

सरकारने मागण्या तातडीने पूर्ण न केल्यास आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिला. मानधनाचा प्रश्न सुटल्याशिवाय माघार घेणार नाही, असेही कर्मचाऱ्यांनी ठामपणे सांगितले.

या आंदोलनात संघटनेचे सह सेक्रेटरी विठ्ठल सुळे, उपाध्यक्ष नदीम पठाण, ज्येष्ठ नेते शिवाजीराव पवार, कविता उमाप यांच्यासह अनेक कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. संघटनेच्या प्रमुख नेत्यांच्या स्वाक्षरीसह मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले.

error: Content is protected !!