सातारा महानगरपालिकेची स्वप्नपूर्ती लवकरच?

जनगणनेला गती देण्याची गरज : मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): सातारा महानगरपालिका होण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले जात असून, या प्रक्रियेला वेग देण्यासाठी जनगणना होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्याचे बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी केले. नगरपालिकेची हद्दवाढ झाली असून, पुढील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही जनगणना वेळेवर पूर्ण झाली, तर महानगरपालिका स्थापन होण्यास चालना मिळेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

सातारा जिल्हा पत्रकार भवनामध्ये आयोजित केलेल्या पत्रकार दिनाच्या कार्यक्रमानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

ई-बसेस लवकरच साताऱ्यात

सातारा शहराच्या वाहतूक व्यवस्थेतील क्रांतीचा विचार करत ई-बसेसच्या उपक्रमासाठी लवकरच पावले उचलली जातील, असेही त्यांनी जाहीर केले.

‘लाडकी बहीण’वरून शशिकांत शिंदेंना शिवेंद्रराजेंचा जोरदार टोला

मंत्री भोसले यांनी ‘लाडकी बहीण योजने’वरून विधान परिषद सदस्य शशिकांत शिंदेंवर तीव्र टीका केली.”महायुती सरकारने सुरू केलेल्या योजनेला बदनाम करण्याचा शिंदे यांचा प्रयत्न आहे. आम्ही पंधराशे रुपये देत असताना त्यांनी ३ हजार रुपये देण्याची घोषणा केली होती. त्यावेळी तो दरोडा नव्हता का?” असा सवाल त्यांनी केला.

भोसले पुढे म्हणाले, “मंत्री आदिती तटकरे यांनी या योजनेत अपात्र लाभार्थ्यांची नावे तपासून त्यांना योजनेतून वगळण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये जर कोणी अधिकारी चुकीच्या पद्धतीने नावे नोंदवत असतील, तर त्यांच्यावरही कडक कारवाई केली जाईल.

समृद्धी महामार्गावर खिळे टाकणाऱ्यांवर कारवाई

समृद्धी महामार्गावर खिळे टाकून गाड्या पंक्चर करण्याच्या घटनांवर तीव्र संताप व्यक्त करत मंत्री भोसले म्हणाले, “हा प्रकार अत्यंत गंभीर असून, यामागील समाजकंटकांवर कडक कारवाई केली जाईल. बांधकाम विभाग आणि एमएसआरडीसी यांना याबाबत सूचना दिल्या जातील.

पालकमंत्रीपदावरून तर्क-वितर्क अनाठायी

पालकमंत्री पदाबाबत सुरू असलेल्या चर्चेवर प्रतिक्रिया देताना भोसले म्हणाले, “ही जबाबदारी मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत आहे. ते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल.”

error: Content is protected !!