दै.लोकमतच्या प्रगती पाटील यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार

मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे पुरस्कार जाहीर

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : ‘कृ. पां. सामक’ जीवनगौरव पुरस्कारासह मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या २०२४ साठीच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारांची घोषणा पत्रकार दिनाच्या दिवशी करण्यात आली. यावर्षीच्या राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकार (मुद्रित) पुरस्कारासाठी दैनिक लोकमत साताराच्या प्रतिनिधी प्रगती पाटील यांची निवड करण्यात आली आहे. दरम्यान, प्रतिष्ठेच्या ‘कृ. पां. सामक’ जीवनगौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ पत्रकार श्रीमती प्रतिमा जोशी यांची निवड करण्यात आली आहे.

प्रगती पाटील यांच्यासह वृत्तवाहिनी उत्कृष्ट पत्रकार (दृकश्राव्य) पुरस्कारासाठी ‘एबीपी माझा’चे पुणे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांची निवड करण्यात आली आहे. तर वार्ताहर संघाचा उत्कृष्ट सदस्य पुरस्कार ‘पुढारी’चे राजन शेलार यांना जाहीर झाला आहे. या पुरस्कारांची घोषणा संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे आणि सरचिटणीस प्रवीण पुरो यांनी केली.

प्रगती पाटील यांनी पत्रकारिता क्षेत्रात केलेल्या भरीव योगदानासाठी हा पुरस्कार प्राप्त केला आहे. त्यांनी सातारा जिल्ह्यातील विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक प्रश्नांवर आपल्या लेखणीने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. शेतकरी आंदोलनांपासून ते आरोग्य आणि शिक्षणाच्या मुद्द्यांवर त्यांच्या लेखांनी स्थानिक आणि राज्यस्तरीय चर्चांना वाव दिला आहे.

त्यांच्या कामामुळे साताऱ्यातील अनेक महत्त्वाच्या समस्यांवर राज्यस्तरीय चर्चा झाली आहे. प्रगती पाटील यांच्या लेखांमध्ये जागतिक, राष्ट्रीय आणि स्थानिक पातळीवर महत्त्वाच्या मुद्द्यांवर सुसंगत आणि तर्कशुद्ध विश्लेषण दिलं जातं. या पुरस्कारामुळे त्यांची पत्रकारिता क्षेत्रातील ओळख अधिक पक्की झाली आहे.

पुरस्कार जाहीर होताच, विविध क्षेत्रांतून साताऱ्यासह राज्यभरातून प्रगती पाटील यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. राजकीय, शैक्षणिक, उद्योग, वैद्यकीय तसेच पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करत, त्यांना भविष्यातही पत्रकारिता क्षेत्रात अधिक कार्य करण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

सर्वसामान्य माणूस केंद्रस्थानी मानून मी पत्रकारितेची वाटचाल सुरू केली. ‘लोकमत’ने मला ‘पत्रकारिता परमो धर्म’चे भान दिले. कोणताही बहुमान हा पुढील प्रवासासाठी नक्कीच बळ, ऊर्जा देत असतो. या प्रवासात पत्रकारितेच्या धर्माशी प्रामाणिक राहून सर्वसामान्यांसाठी कार्यरत राहीन, हा शब्द आजच्या निमित्ताने देते.

  • प्रगती जाधव पाटील
error: Content is protected !!