छ.शिवरायांची ऐतिहासिक वाघनखं साताऱ्यात आणणार : आ.शिवेंद्रराजे

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक वाघनखं लंडनच्या म्युझियममध्ये आहेत, ती वाघनखं भारतात आणण्याची घोषणा महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. येत्या दोन महिन्यात ती वाघनखं भारतात येणार आहेत. भारतात आणल्यानंतर मुंबई, पुणे, कोल्हापूर आणि नागपूर या शहरातील वस्तुसंग्रहालयात शिवप्रेमींना पाहण्यासाठी ती ठेवण्यात येणार आहेत. दरम्यान, साताऱ्यातील शिवप्रेमींना आणि सातारकरांना छत्रपती शिवरायांची वाघनखं पाहता यावीत यासाठी ती साताऱ्यातही आणावीत अशी मागणी आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी ना. मुनगंटीवार यांच्याकडे केली असून त्याला ना. मुनगंटीवार यांनी सहमती दर्शवली आहे. त्यामुळे शिवरायांच्या भीमपराक्रमाची साक्ष असणारी वाघनखं सातारकर आणि शिवप्रेमींना पाहता येणार आहेत.

सातारा जिल्ह्यातील प्रतापगड येथे छ. शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध करून स्वराज्यावरील आक्रमण परतवून लावले होते. त्यावेळी छ. शिवाजी महाराजांनी वाघनखांचा वापर केला होता. ती वाघनखं १८२४ मध्ये इंग्रजांनी लंडनला नेली. तब्बल १९९ वर्षांनी ती वाघनखं भारतात परत येणार आहेत. केवळ तीन वर्ष हा अनमोल ठेवा भारतात राहणार असून महाराष्ट्रातील शिवप्रेमींना ही अनमोल वाघनखं पाहता यावीत म्हणून मुंबई, पुणे, कोल्हापूर आणि नागपूर येथील वस्तुसंग्रहालयात ती ठेवण्याचा निर्णय ना. मुनगंटीवार यांनी जाहीर केला होता. मात्र, मराठ्यांची राजधानी असलेल्या साताऱ्यात ही वाघनखं येणार नसल्याने सातारकर आणि शिवप्रेमींमधून नाराजी व्यक्त होत होती परंतु, आता सातारकर शिवप्रेमींना छ. शिवरायांची वाघनखं पाहण्याची संधी आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या प्रयत्नांमुळे उपलब्ध होणार आहे.

छ. शिवरायांची ऐतिहासिक वाघनखं मुंबई, पुणे, कोल्हापूर आणि नागपूर या चारच शहरात पाहण्यासाठी ठेवली जाणार असल्याचे समजल्यानंतर आ. शिवेंद्रसिंहराजेंनी ना. मुनगंटीवार यांच्याशी आज दुपारी दूरध्वनीवरून चर्चा केली. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने सातारा भूमी पावन झाली आहे. किल्ले अजिंक्यतारावर छ. शिवाजी महाराजांचे वास्तव्य राहिले आहे. सातारा ही ऐतिहासिक भूमी असून समस्त जिल्हावासीय आणि तमाम शिवप्रेमींना शिवरायांची वाघनखं पाहता यावीत, यासाठी मुंबई, पुणे, कोल्हापूर आणि नागपूर प्रमाणेच ती वाघनखं सातारा शहरातही आणली जावीत, आणि ती छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयात ठेवावीत, अशी आग्रही मागणी आ. शिवेंद्रसिंहराजेंनी ना. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली. त्यांनतर ना. मुनगंटीवार यांनी शिवरायांची वाघनखं साताऱ्यातही आणली जातील असा शब्द दिला आहे. त्यामुळे आता शिवरायांची ऐतिहासिक, अनमोल वाघनखं साताऱ्यात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

साताऱ्यात शिवरायांची वाघनखं येण्याचा दिवस निश्चित झाल्यानंतर त्या वाघनखांचं वाजतगाजत, मोठ्या जल्लोषात स्वागत केले जाईल, असे आ. शिवेंद्रसिंहराजेंनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. तसेच या ऐतिहासिक सोहळ्यात सातारा जिल्हावासियांनी आणि तमाम शिवप्रेमींनी सहभागी व्हावे, असे आवाहनही आ. शिवेंद्रसिंहराजेंनी यानिमित्ताने केले आहे.

error: Content is protected !!