मतदान जनजागृती काव्यलेखन,निबंध स्पर्धेचे कोरेगावला आयोजन

जनजागृती पथक प्रमुख यशेंद्र क्षीरसागर यांची माहिती

कोरेगाव,(भूमिशिल्प वृत्तसेवा): मतदान जनजागृती करण्यासाठी कोरेगाव विधानसभा मतदारसंघ प्रशासनातर्फे सर्व शक्य ते प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कवितालेखन आणि निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जनजागृती पथक प्रमुख यशेंद्र क्षीरसागर यांनी दिली.

क्षीरसागर म्हणाले, लोकशाहीमध्ये मतदानाचे महत्त्व, मतदान आपले राष्ट्रीय कर्तव्य, चला मतदान करू देश घडवू! या तीन पैकी एका विषयावर आपली कविता लिहून पाठवावी. तसेच याच विषयांपैकी एका विषयावर ३०० शब्दांमध्ये निबंध लिहून पाठवावा. कवितेला शब्द संख्येचे बंधन नाही.निबंध आणि कविता स्पर्धा या शालेय विद्यार्थी गट, महाविद्यालयीन विद्यार्थी गट, खुला गट अशा तीन गटांमध्ये होईल .प्रत्येक गटातून तीन पारितोषिके दिली जातील. स्मृतीचिन्ह, पुस्तक आणि मानपत्र असे या पारितोषिकाचे स्वरूप असेल.

आपला निबंध तसेच कविता ,”श्री.यशेन्द्र क्षीरसागर, सांख्यिकी विस्तार अधिकारी तथा जनजागृती पथक प्रमुख ,पंचायत समिती कोरेगाव, पुसेगाव रोड,तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा” या पत्त्यावर एक नोव्हेंबर पर्यंत पाठवावेत असे आवाहन करण्यात आले असून विजेत्यांना आकर्षक पारितोषिके दिली जाणार आहेत तसेच स्पर्धेसाठी प्रवेश फी नसून मोफत असणार आहे.

शंभर टक्के मतदान व्हावे आणि तशी आदर्श व्यवस्था निर्माण व्हावी, नागरिकांनी आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावावे आणि लोकशाही सुदृढ करण्यासाठी, बळकट करण्यासाठी जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी कोरेगाव विधानसभा मतदारसंघाच्या प्रशासनातर्फे विविध उपक्रम राबविले जात आहेत .त्याचाच एक भाग म्हणून कविता लेखन आणि निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थी तसेच नागरिकांनी यामध्ये उत्स्फूर्तपणे भाग घ्यावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

या उपक्रमासाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अभिजित नाईक, तहसीलदार डॉ. संगमेश कोडे यांचे मार्गदर्शन लाभले.यावेळी पथकातील सदस्य मंगेश घाडगे उपस्थित होते.

error: Content is protected !!