परंपरा जपत पर्यावरणपूरक उपाययोजना करण्याचे निर्देश

मुंबई,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मोठ्या गणेशमूर्तींच्या विसर्जनासंदर्भात परंपरा व प्रथांचा मान राखून पर्यावरणपूरक आणि दीर्घकालीन उपाययोजनांचा समावेश असलेले ठोस धोरण तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पर्यावरणपूरक सण साजरे करण्यासंबंधी चर्चा झाली. यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री व मुंबई उपनगरचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार, बृहन्मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, महाधिवक्ता वीरेंद्र सराफ, मुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, अतिरिक्त आयुक्त अमित सैनी, विधी परामर्षी सुवर्णा केवले तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रभारी सदस्य सचिव रविंद्र आंधळे आदी उपस्थित होते.
न्यायालयाच्या निर्देशांनुसार राज्य शासनाने राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान आयोगाकडून अहवाल मागविला होता. आयोगाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांनी सादर केलेल्या अहवालात काही महत्त्वपूर्ण शिफारसी करण्यात आल्या आहेत. खोल समुद्रात मोठ्या मूर्तींचे विसर्जन करण्याची शक्यता व परिणामांचा सखोल अभ्यास करून न्यायालयासमोर सरकारची बाजू मांडावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, विसर्जनानंतर समुद्रकिनारे स्वच्छ ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना आवश्यक आहेत. तसेच गणेशमूर्तींच्या निर्मितीत पर्यावरणस्नेही साहित्य आणि नैसर्गिक रंगांचा वापर व्हावा यासाठी उत्पादक व नागरिकांमध्ये जनजागृती करावी.
सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सांगितले की, सार्वजनिक गणेशोत्सव परंपरेनुसार साजरा व्हावा; मात्र उंच व मोठ्या मूर्तींसाठी पर्यावरणपूरक विसर्जनाचे पर्याय शोधणे अत्यावश्यक आहे. छोट्या मूर्ती कृत्रिम तलावात विसर्जित कराव्यात. तसेच शाडू व इतर पर्यावरणस्नेही साहित्याचा वापर प्रोत्साहन देण्यात यावा.
डॉ. अनिल काकोडकर यांनी यावेळी स्पष्ट केले की, रासायनिक रंगांमुळे प्रदूषणाचा धोका वाढतो. त्यामुळे नैसर्गिक रंग व पर्यावरणपूरक साहित्य वापरण्यावर भर द्यावा आणि याबाबत व्यापक जनजागृती करावी.

You must be logged in to post a comment.