स्वराज्याच्या राजधानीत साहित्याचा महाकुंभ!

साताऱ्यात ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन; ३२ वर्षानंतर साताऱ्याला यजमानपद

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : तब्बल ३२ वर्षांनंतर साताऱ्याला पुन्हा एकदा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्याचा मान मिळाला आहे. ९९ वे संमेलन महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी (सातारा) शाखा आणि मावळा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शाहू स्टेडियमवर पार पडणार आहे. या ऐतिहासिक निर्णयावर शिक्कामोर्तब पुणे येथे पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या विशेष बैठकीत करण्यात आले. या बैठकीस महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्यासह सर्व घटक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

९९व्या संमेलनाच्या यजमानपदासाठी सदानंद साहित्य मंडळ (औदुंबर), महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा (इचलकरंजी), दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा (कोल्हापूर) आणि शाहूपुरी शाखा (सातारा) यांनी प्रस्ताव दिले होते. स्थळ निवड समितीने ५ ते ७ जूनदरम्यान सर्व स्थळांना भेटी दिल्यानंतर ८ जून रोजी पुण्यात झालेल्या बैठकीत साताऱ्याच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले. यानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अधिकृत बैठकीत हा निर्णय अंतिम करण्यात आला.

साताऱ्यात यापूर्वी तीन वेळा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन झाले आहे. १९०५ मध्ये रघुनाथ पांडुरंग करंदीकर यांच्या अध्यक्षतेखाली तिसरे, १९६२ मध्ये न. वि. गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली ४४वे आणि १९९३ मध्ये विद्याधर गोखले यांच्या अध्यक्षतेखाली ६६वे संमेलन येथे पार पडले होते. त्यामुळे येणारे संमेलन हे साताऱ्यातील चौथे असेल. या आयोजनासाठी गेल्या १२ वर्षांपासून शाहूपुरी शाखेच्या वतीने सातत्यपूर्ण पाठपुरावा करण्यात येत होता.

नव्या संमेलनाचे आयोजन साताऱ्याच्या मध्यवर्ती भागात असलेल्या छत्रपती शाहू स्टेडियमवर होणार आहे. हे मैदान १४ एकर क्षेत्रफळाचे असून, २५ हजार प्रेक्षकांची आसनव्यवस्था, दोन उपमंडप, ग्रंथ प्रदर्शन, कवी कट्टा, भोजन व्यवस्था आणि इतर लहान कार्यक्रमांसाठी तीन सभागृहे उपलब्ध आहेत. शिवाय पाठीमागे असलेल्या पोलिस परेड ग्राउंडच्या आठ एकर जागेचा वापर पार्किंगसाठी करता येणार आहे. हे मैदान शहराच्या मध्यभागी आणि बस स्थानकाच्या जवळ असल्याने साहित्य रसिक व पाहुण्यांना मोठ्या प्रमाणात सुविधा होणार आहे.

या संमेलनाच्या नियोजनासाठी मार्गदर्शन समितीही गठित करण्यात आली असून त्यात प्रा. मिलिंद जोशी, गुरुय्या स्वामी, सुनिताराजे पवार, विनोद कुलकर्णी, प्रदीप दाते, दादा गोरे आणि डॉ. उज्ज्वला मेहेंदळे यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, हा निर्णय सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली साताऱ्यात पार पडलेल्या बैठकीत अंतिम करण्यात आला होता . यावेळी अनेक मान्यवर साहित्यिक, संस्थांचे पदाधिकारी आणि आयोजक उपस्थित होते.

शाहूनगरीस मिळालेल्या या यजमानपदामुळे साताऱ्याच्या ऐतिहासिक, सामाजिक आणि सांस्कृतिक अस्मितेचा जागर होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार, क्रांतिकारी वारसा, लोककलेची समृद्ध परंपरा आणि साहित्यप्रेम यांचा संगम या संमेलनात अनुभवता येणार आहे. यानिमित्ताने नव्या उमेदीने आणि नव्या दृष्टीकोनातून साहित्यिक चळवळ साकारली जाईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.

जल्लोष सोहळा.. चला शिवतीर्थावर

या ऐतिहासिक संमेलनाच्या घोषणेनंतर सातारकरांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या आनंदाचा जल्लोष करण्यासाठी रविवारी, ८ जून रोजी सायंकाळी ६ वाजता पोवई नाका येथे शिवतीर्थावर “जल्लोष सोहळा” आयोजित करण्यात आला आहे. या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार असून, संमेलनाच्या तयारीची औपचारिक सुरुवात होणार आहे. सातारकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला अभिमान व्यक्त करावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

सातारकरांना दिलेला शब्द पूर्ण केला : ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले

९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाचा मान सातारा शहराला दिल्याबद्दल मी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी आणि सर्व सदस्यांचे मनःपूर्वक आभार मानतो. शताब्दीच्या उंबरठ्यावर असलेले हे संमेलन ऐतिहासिक आणि वैशिष्ट्यपूर्ण होण्यासाठी आम्ही जीवाचे रान करू. जगभरातील तमाम मराठी रसिकांना मी या संमेलनाला उपस्थित राहण्यासाठी आत्ताच निमंत्रण देतो. महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाहूपूरी शाखा, मावळा फाऊंडेशन, महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, कार्यवाह सुनीताराजे पवार, शाखेचे अध्यक्ष नंदकुमार सावंत आणि सातारकर हे कार्य स्वतःच्या घरचे असल्याप्रमाणे करतील. मी सातारा येथे संमेलन घेण्याचा शब्द सातारकरांना दिला होता, तो आज पूर्ण झाला आहे. संमेलन देखणे आणि दिमाखदार होईल, यात तिळमात्र शंका नाही.

“साताऱ्यातील संमेलन देशात आदर्श ठरेल” : विनोद कुलकर्णी“

साताऱ्यात साहित्य संमेलन व्हावे, या उद्देशानेच शाहूपुरी शाखेची स्थापना झाली होती. गेली सलग बारा वर्षे आम्ही ही मागणी सातत्याने मांडत होतो. अखेर ३२ वर्षांनंतर साताऱ्याला हा मान मिळवून देण्यात मी योगदान देऊ शकलो, याचा अत्यंत आनंद आहे. या संमेलनामागे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे आणि सर्व सातारकरांचे मोलाचे पाठबळ राहील, असा विश्वास आहे. हे संमेलन महाराष्ट्रातच नव्हे, तर देशात आदर्श ठरेल, अशी खात्री वाटते!”

error: Content is protected !!