महाराज, कोरोना आणि गनिमी कावा…!

सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा) : आज काय? या  यू – ट्यूब चॅनेलची प्रस्तुती असलेला ‘महाराज, कोरोना आणि गनिमी कावा’ हा सामाजिक संदेश देणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून त्याच्या सादरीकरणास प्रचंड प्रतिसाद लाभत आहे. 
पुण्यातील ग्राफिक्स डिझायनर अतुल दुधाळ यांनी व्हिडिओची निर्मिती केली असून प्रसिद्ध  लेखक – व्याख्याते आणि ‘भूमिशिल्प’चे कार्यकारी संपादक संदीप चव्हाण यांनी या विषयाचे लेखन आणि सादरीकरण केले आहे. आज सार्‍या जगभर पसरलेलं कोरोना संकट छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कोसळलं असतं तर काय घडलं असतं ? हे संकट परतवून लावण्यासाठी महाराजांनी कोणत्या उपाययोजना आखल्या असत्या? रयतेची सुरक्षितता आणि तिच्या आरोग्याची काळजी त्यांनी कशाप्रकारे घेतली असती? याची कल्पना संदीप चव्हाण यांनी शब्दबद्ध केली आणि आपल्या आवाजाद्वारे तिचे सादरीकरण केले. अतुल दुधाळ यांनी ग्राफिक्स डिझायनिंगचे कौशल्य वापरून या विषयाला अक्षरशः जिवंत केले. त्यातूनच निर्मिती झालेला व्हिडिओ म्हणजे ‘महाराज, कोरोना आणि गनिमी कावा !’ ‘सकाळ मीडिया समुहा’ने या व्हिडिओची दखल घेऊन त्याला सकाळ फेसबुक पेजवर स्थान दिले आहे. 
‘रायगड माझा’ तसेच ’न्यूज लिंक मराठी’ या प्रसिद्ध यू- ट्यूब चॅनेल्सनीही हा व्हिडिओ प्रसारित केला आहे. या व्हिडिओला मोठ्या प्रमाणात लाइक, शेअर आणि कमेंट्स लाभत आहेत.




error: Content is protected !!