सातारा- जावलीतील जनतेचे प्रेम आणि विश्वास हीच माझी ताकद : आ.शिवेंद्रसिंहराजे

प्रत्येक गावातील विकासकामे मार्गी लावल्याचे समाधान

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): सातारा- जावलीतील जनतेने माझ्यावर विश्वास टाकला, आमदारकीची संधी दिली. मतदारसंघाचा चौफेर विकास करून जनतेने दिलेल्या संधीचे मी सोनं केले आहे. सातारा आणि जावलीतील जनतेशी कधीही न तुटणारी नाळ जोडली गेली आहे. जनतेच्या कायम ऋणात राहून मतदारसंघाचा विकास करणे हेच माझे कर्तव्य आहे. मतदारसंघातील जनतेचे प्रेम आणि विश्वास हीच माझी खरी ताकद आहे, असे उद्गार सातारा- जावली विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी काढले.

सातारा तालुक्यात विविध गावांमध्ये शिवेंद्रसिंहराजे यांचा गावभेट दौरा सुरु असून यानिमित्ताने ग्रामस्थांच्या प्रत्यक्ष भेटीवर शिवेंद्रसिंहराजेंनी भर दिला आहे. शिवेंद्रसिंहराजेंनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला असून सर्वत्र त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात येत आहे. गावागावात अबालवृद्ध शिवेंद्रसिंहराजेंना अक्षरशः गराडा घालत आहेत. शिवेंद्रसिंहराजेही नेहमीप्रमाणे प्रत्येकाची आपुलकीने विचारपूस करत आहेत. स्व. भाऊसाहेब महाराजांच्या विचारसरणीचा अवलंब करून जनतेची सेवा केली असून या जनसेवेत कधीही खंड पडणार नाही, असा शब्द शिवेंद्रसिंहराजेंनी यानिमित्ताने दिला.

जात- पात, गट- तट न मानता सर्वधर्म समभाव जपत सर्वांचे प्रश्न आपण सोडवले आहेत. जनतेच्या सुखदुःखात सहभागी होण्याचे भाग्य मला लाभले आहे. सातारा- जावली हेच माझे घर आणि हीच माझी कर्मभूमी आहे. जनतेच्या आपुलकी, प्रेम, जिव्हाळा आणि पाठिंब्याच्या जोरावर मतदारसंघात विकासगंगा प्रवाहित ठेवली आहे. यापुढेही विकासाचा झंजावात कायम सुरु राहील आणि विकासाच्या बाबतीत प्रत्येक गाव आदर्श करण्यासाठी आपण प्रयत्न करू, अशी ग्वाही शिवेंद्रसिंहराजेंनी याप्रसंगी दिली.

error: Content is protected !!