जिल्ह्यात मतदार पुनःनिरीक्षण कार्यक्रम जाहीर
सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा) :जिल्ह्यात प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनःनिरीक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून मतदार नाव नोंदणी, नाव कमी करणे, मतदार यादीतील दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्याचा लाभ सर्व मतदारांनी घ्यावा तसेच नवमतदारांनी नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी पत्रकार परिषदेत केले.
जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी म्हणाले, प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करून विशेष संक्षिप्त पुनःनिरीक्षण कार्यक्रम राबवण्यात येत आहे. नाव नोंदणी, नाव कमी करणे, मतदार यादीतील दुरुस्तींची कामे करण्यासाठी ९ डिसेंबरपर्यंत मोहीम राबवण्यात येणार आहे. प्रारूप यादी बीएलओ यांच्याकडे असून मतदारांनी माहिती तपासून घ्यावी. त्यासाठी फॉर्म ६ भरून दुरुस्ती करावी.
जिल्ह्यात २५ लाख मतदार असून त्यामध्ये १३ लाख ५० हजार पुरूष व १२ लाख ५० हजार स्त्री मतदार आहेत. लोकसंख्येच्या ७१ टक्के मतदार आहेत. १८ ते १९ वयोगटातील मतदार १ लाख १६ हजार मतदार असणे आवश्यक होते पण ते २६ हजार आहेत. नवमतदारांच्या नोंदणीसाठी विशेष मोहिम हाती घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांचे कँप घेण्यात येणार आहे.
युवक-युवतींना यावर्षातील १ जानेवारी, १ एप्रिल आणि १ ऑक्टोबर या दिवशी १७ वर्षे पूर्ण होत असतील तर ते पुढील वर्षीसाठी आत्ताच नोंदणी करू शकतात.प्रत्येक गावात १ ते ७ डिसेंबर या दरम्यान प्रत्येक गावात ग्रामसभा घेण्यात येणार आहे. गावातून स्थलांतर होत असते. पत्ते बदलतात. हे बदल मतदारांना करता येतील.
एस.सी., व्ही. जे. एन. टी, वारांगणा, तृतीयपंथी, दिव्यांग मतदारांची मतदार नोंदणी होत नाही. या घटकांतील प्रत्येकाची नोंदणी व्हावी यासाठी विशेष ड्राईव्ह घेण्यात येणार आहे. त्यासाठी सेवाभावी संस्थांची मदत घेतली जाईल. काही कागदपत्रे नसतील तर स्वयंघोषणा केल्यास मतदान केंद्र मिळेल फॉर्म ६ भरल्यानंतर मतदान ओळखपत्र मिळते. बर्याचदा पत्त्यावर मतदान ओळखपत्र न आल्यास १९५० या क्रमांकावर संपर्क साधावा.
जिल्ह्यात ३ हजार १९ मतदान केंद्रे आहेत. ८५० मतदार एका मतदान केंद्रावर असतील. त्यापेक्षा जादा मतदार संख्येमुळे जिल्ह्यात मतदान केंद्रांची संख्या वाढली आहे. जावली, सातारा तालुक्यात २ कि.मी.पेक्षा जादा अंतरावर असणारी १८ मतदान केंद्रे होती. जवळ असणार्या शाळा, अंगणवाडी येथे ही मतदान केंद्रे घेण्यास मंजुरी मिळाली आहे. या कामासाठी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची मदत घेतली जाईल.
दुर्गम भागातील मतदान केंद्रांना इंटरनेट सेवा तसेच मोबाईल सेवा सुरू करण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठीचे सर्व्हे करण्यात आले आहेत. लवकरच ही सेवा सुरू होईल. असेही यावेळी जिल्हाधिकारी डूडी यांनी सांगितले.यावेळी जिल्हा निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे उपस्थित होते.
You must be logged in to post a comment.