मुंबई विद्यापीठ महोत्सवात विले- पार्लेच्या साठे महाविद्यालयाचा डंका

मुंबई,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : मुंबई विद्यापीठ आयोजित युवा महोत्सवात विले-पार्ले येथील साठे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘साठी’ या एकांकिकेने अंतिम फेरीत सुवर्णपदक पटकावत विजेतेपदाचा मान मिळवला. राजीव मुळ्ये यांचे दमदार लेखन, प्रभावी दिग्दर्शन आणि विद्यार्थ्यांच्या ताकदीच्या अभिनयाच्या बळावर या एकांकिकेने परीक्षकांची मने जिंकली.
याशिवाय वैयक्तिक विभागातही ‘साठी’वर पारितोषिकांचा वर्षाव झाला. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा मान, नंदिनी हरकेश निर्मल हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे सुवर्णपदक, तर मोहित अजय शेजवळे याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे रौप्यपदक मिळाले. अशा दुहेरी-तिहेरी यशामुळे ‘साठी’ने राज्यस्तरीय महोत्सवात ठसा उमटवला.
ही एकांकिका लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या “माझी मैना गावावर राहिली” या लोकप्रिय छक्कडवरून प्रेरित आहे. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या काळात गाजलेली ही लावणी आजही तितकीच परिणामकारक ठरली. महाराष्ट्राच्या निर्मितीनंतरच्या साठ वर्षांच्या प्रवासावर लेखकाने केलेले भाष्य प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडणारे ठरले.
लेखक राजीव मुळ्ये हे साताऱ्याचे असून, त्यांच्या लेखणीतून उमटलेली सामाजिक जाणीव आणि कलात्मक मांडणीला विद्यार्थ्यांच्या दमदार अभिनयाची जोड मिळाल्याने ‘साठी’ने सुवर्ण विजयाची नोंद केली. या कामगिरीमुळे राज्यभरात तसेच साताऱ्यातील सर्व स्तरांतून अभिनंदन व कौतुक होत आहे.

You must be logged in to post a comment.