जिल्ह्यातील बेकायदेशीर सावकारीविरोधात ‘रयत’ आक्रमक

जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे कडक कारवाईची मागणी

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा जिल्ह्यात बेकायदेशीर सावकारीच्या प्रकरणात रयत क्रांती संघटना सक्रिय झाली असून प्रशासनाकडे ठोस कारवाईची मागणी केली आहे. संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष देवदास जाधव यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे सावकारींच्या वाढत्या गैरव्यवहाराविरुद्ध तत्काळ कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, अनेक ठिकाणी सावकारांकडे कायदेशीर परवानगी नसतानाही कर्जवाटप केले जात असून, व्याजदर अत्यंत जुलमी व अन्यायकारक आहेत. वेळेत व्याज फेड न केल्यास शेतकरी, कामगार व लहान व्यापाऱ्यांची जमीन, घरे आणि शेतीच्या हक्कपत्रांचा बेकायदेशीर ताबा घेतला जातो. त्याचबरोबर कर्जदारांना धमक्या देणे, मानसिक व शारीरिक त्रास देणे यासारखे प्रकारही वाढले आहेत.

यामुळे निवेदनात प्रशासनाने जिल्ह्यातील बेकायदेशीर सावकारांविरुद्ध विशेष मोहीम हाती घ्यावी, विनापरवाना सावकारी करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, तसेच शेतकरी व नागरिकांच्या तक्रारी तत्काळ नोंदवून न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी रयत क्रांती संघटनेचे युवक जिल्हा अध्यक्ष प्रकाश साबळे, प्रशांत मोरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!