ज्येष्ठ नेत्यांच्या अवतीभवती केवळ घोटाळेखोर; खासदार उदयनराजे भोसले यांची टीका

विकासाचा शिष्टाचार राखणाऱ्यांना बळ देण्याचे आवाहन

कराड,(भूमिशिल्प वृत्तसेवा): यशवंत विचाराचे पाईक असल्याचे भासवणाऱ्या ज्येष्ठ नेत्याच्या अवतीभोवती केवळ घोटाळेखोर आहेत. संपूर्ण लोकसभा मतदारसंघात त्यांना भिंग लावूनही चारित्र्यसंपन्न उमेदवार मिळाला नाही, अशी टीका सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी केली. तसेच विकासाचा शिष्टाचार राखणाऱ्यांना बळ देण्याचे आवाहनही त्यांनी केले.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी महायुतीच्या वतिने कराड शहरात महारॅली काढण्यात आली. त्यानंतर विठ्ठल चौकात आयोजित केलेल्या प्रचार सभेत ते बोलत होते. याप्रसंगी माजी मंत्री दिलीपराव कांबळे, माजी आमदार आनंदराव पाटील, भाजपचे लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, एडव्होकेट विकास पवार, कराड नगरपालिकेचे माजी सभापती हनुमंतराव पवार, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, सुधीर एकांडे, आप्पासाहेब गायकवाड , शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अक्षय मोहिते, तालुकाप्रमुख काकासाहेब जाधव, शिवसेना उपजिल्हाप्रमुख शंकर वीर, राजेंद्र माने, नगरसेविका स्मिता हुलवान, भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष संग्राम बर्गे, माजी नगरसेवक गजेंद्र कांबळे, ओंकार मुळे, विजय वाटेगावकर, संदीप थोरवडे, गणेश भोसले, सुलोचनाताई पवार, कल्पना पवार, निशांत ढेकळे, काकासाहेब जाधव, सुदर्शन पाटसकर, रणजित पाटील, मनसेचे दादासाहेब शिंगण आदींसह विविध महायुतीतील घटक पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

खासदार उदयनराजे भोसले पुढे म्हणाले, काँग्रेसने अनेक वर्ष जनतेला विकासापासून दूर ठेवले. चळवळीचा इतिहास असलेल्या जनतेने या पक्षाला बाजूला केले. भारतीय जनता पक्षावर विश्वास दाखवला. गेल्या ५५ वर्षात जे घडलं नाही ते अवघ्या दहा वर्षांमध्ये मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने करून दाखवले आहे. आता पुन्हा सत्तेत येण्याचे स्वप्न काँग्रेस आणि त्यांचे घटक पक्ष पाहत आहेत. वास्तविक जनतेपुढे जाण्यासाठी त्यांच्याकडे कोणताही ठोस कार्यक्रम नाही. देशातील जनता आपल्याला सत्ता देणार नाही, हे लक्षात आल्यामुळे मोदी सरकारवर बेछूट आरोप करण्यावर काँग्रेसच्या नेत्यांनी भर दिलेला आहे. भाजप संविधान बदलायला निघाले आहे, असा खोटा प्रचार सुरू आहे. वास्तविक स्वतःचा नाकर्तेपणा लपवण्यासाठी काँग्रेस नेते असे आरोप करत आहेत.

आणीबाणीच्या काळातच काँग्रेसचे नेत्या इंदिरा गांधी यांनी संविधानाचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला होता. लोक विरोधात जातात म्हणून त्यांना बळजबरीने तुरुंगात टाकले गेले. आताही तेच गलिच्छ राजकारण काँग्रेसतर्फे सुरू आहे. भाजप पक्ष मुस्लिम विरोधी आहे असा अपप्रचार काँग्रेसचे नेते करत आहेत. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेल्या समतेच्या आणि सर्वधर्मसमभावाच्या विचाराने भाजप वाटचाल करत आहे. तळागाळातील प्रत्येक व्यक्तीचा उत्कर्ष करण्याच्या हेतूने पंतप्रधान नरेंद्र मोदी पावले उचलत आहेत. त्यांचे हात आणखी बळकट करण्याची आता वेळ आलेली आहे. आत्ता आपण जर चुकीचा निर्णय घेतला तर त्याचा पश्चाताप पुढील अनेक वर्षे आपल्या पिढ्यांना करावा लागणार आहे, त्यामुळे महाभकास आघाडीला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आपण सर्वांनी संघटितपणे प्रयत्न करूया.

माजी मंत्री दिलीप कांबळे म्हणाले, केंद्रामध्ये ४०० च्या वर खासदार भारतीय जनता पक्षाच्या विचाराचे निवडून आणायचे आहेत, भाजपच्या विकासाच्या धोरणावर जनतेचा विकास असल्याने हे शक्य होणार आहे. मात्र विरोधक घटना बदलण्यासाठी ४०० खासदार भाजपला हवे आहेत, असा खोटा प्रचार करत आहेत. नरेंद्र मोदींनी स्वतः कराडच्या भाषणामध्ये मी जिवंत असेपर्यंत घटना बदलून देणार नाही, असे जाहीरपणे सांगितलेले आहे.

 डॉ. अतुल भोसले म्हणाले,  खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणण्याची धमक उदयनराजेंनी वेळोवेळी दाखवून दिले आहे. प्रत्येकाला समान न्याय देण्याची त्यांची भूमिका असते. खासदार उदयनराजे यांच्या प्रयत्नामुळे जिल्ह्याला ९९०० कोटी रुपयांची विकास कामे मिळाली. उदयनराजेंच्या पत्रावर कराडातील छत्रपती शिवाजी स्टेडियमचा विकास होऊ घातला आहे. केंद्रातील नेत्यांशी सलोखा असलेला आणि दूरदृष्टी असलेला खासदार आपल्याला उदयनराजेंच्या निमित्ताने निवडून द्यायचा आहे, यासाठी उरलेल्या दिवसांमध्ये मताचा टक्का कसा वाढेल यासाठी प्रयत्न करायचा आहे.

error: Content is protected !!