सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): आपल्या जिल्ह्याची परंपरा ही शांततेची परंपरा आहे. यावर्षीचा गणेशोत्सव सर्वांनी मिळून संयमाने व शांततेने आनंदात पार पाडूया. प्रशासन व नागरिकांमध्ये समन्वय राहावा यासाठी प्रशासनाने नागरिकांना समजून घेण्याची, सामंजस्याची भूमिका ठेवावी. तर नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे. गणेशोत्सव उत्साहात,धुमधडाक्यात व उत्साहाला कोणतेही गालबोट न लावता पार पाडूया, असे आवाहन पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी केले.
गणेशोत्सव व ईदच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री श्री देसाई यांनी जिल्हा प्रशासन व पोलीस दला सोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलीस अधीक्षक बापू बांगार उपस्थित होते. तर जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार, ठाणे अंमलदार, पोलीस निरीक्षक आदी सर्व महसूल व पोलीस यंत्रणेचे संबंधित अधिकारी दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी पुसेसावळी येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर महसूल आणि पोलीस यंत्रणेने ज्या संवेदनशीलपणे व सामंजस्याने स्थिती हाताळली त्याबद्दल यंत्रणेचे अभिनंदन केले. यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे व नागरिक यांनी गणेशोत्सव जल्लोषात साजरा करण्यासाठी खूप मोठी तयारी केली आहे असे सांगून पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, लोकांना कोणत्याही पद्धतीचा त्रास होऊ नये यासाठी यंत्रणांनी सर्वसामान्य नागरिकांबाबत सामंजस्याची भूमिका ठेवावी. तथापि जाणीवपूर्वक कोणी त्रास निर्माण करत असेल तर अशांसाठी यंत्रणांनी आपले अधिकार वापरावेत. ज्या ठिकाणी उत्सव काळात गर्दी होते अशा ठिकाणी महिला, मुलींची विशेष काळजी घेण्यात यावी. त्यांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. विसर्जनाच्या मिरवणुकीच्या वेळी यंत्रणांवर ताण येतो या ठिकाणी सतर्क रहावे. डॉल्बी लावत असताना आवाजाची मर्यादा कोणी ओलांडू नये असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी म्हणाले, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्यात विविध स्तरांवर शांतता समितीची बैठक घेण्यात आली आहे . शांतता समितीतील सदस्यांबरोबर यंत्रणांनी सातत्याने समन्वय ठेवावा. प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये विविध सामाजिक घटकांना घेऊन समिती स्थापन केली आहे त्यांच्याशी ही यंत्रणांनी सातत्याने संवाद व संपर्क ठेवावा. पोलीस पाटील, कोतवाल, तलाठी यांच्याकडून सातत्याने माहिती घ्यावी. त्यांच्या सोबत रोज बैठक घ्यावी. यंत्रणांनी कोणत्याही घटनेपासून अनभिज्ञ राहू नये. महसूल विभागाने या काळात पोलीस विभागाशी समन्वय ठेवावा. नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी आवश्यक ती सर्व दक्षता घ्यावी. लोकांना समजून घेऊन नियमन व्हावे. मोठ्या प्रमाणावर उत्सव काळात गर्दी होणाऱ्या ठिकाणी आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवावी. पुरेसा औषधसाठा उपलब्ध ठेवावा. नजीकच्या ॲम्बुलन्सचे नंबर सर्व गणेश मंडळांची शेअर करण्यात यावेत. पोलीस विभागाने सोशल मीडिया बाबत जनजागृती करण्यासाठी विविध प्रकारची आर्टवर्क निर्माण केली आहेत त्यांची सर्वदूर प्रसिद्धी करावी. नागरिकांनी सोशल मीडियावरील पोस्ट बाबत जागृत असावे. समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट सोशल मीडिया वरून शेअर करू नयेत. यासाठी यंत्रणांनीही नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करावी.
पोलीस अधीक्षक समीर शेख म्हणाले, यावर्षी जवळपास पाच हजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे गणपती बसविणार आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार आहे.या काळात चोख बंदोबस्त रहावा यासाठी पोलीस आणि होमगार्ड यंत्रणा तैनात करण्यात येत आहे. जिल्ह्यात सर्व स्तरावर सलोखा समितीची बैठक घेण्यात आली आहे.स्थानिक स्वराज्य संस्था व नगरपालिका यांच्यासोबतही समन्वय ठेवण्यात आला आहे.गर्दीमुळे एखादी आपत्ती ओढवल्यास त्यावर तत्काळ उपाययोजना करण्यासाठी दळणवळण यंत्रणांशीही समन्वय ठेवण्यात येत आहे.
गणेशोत्सव मंडळांना आचारसंहिता देण्यात आली असून समाजात तेढ निर्माण होणारे देखावे उभे करू नयेत यासाठी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये सोशल मीडियावरील पोस्टवर लक्ष ठेवण्यासाठी सायबर सेल कार्यरत करण्यात आला आहे. गेली अनेक वर्षे गणेशोत्सव जिल्ह्यात अत्यंत चांगल्या पद्धतीने साजरा झाला असून यावर्षीही गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद हे सण अतिशय चांगल्या पद्धतीने व समन्वयाने साजरे करण्यात येतील असेही शेख म्हणाले.
You must be logged in to post a comment.