‘पत्रकबाजी बंद करा, विकासकामांची वाट धरा !’

सातारकरांची पालिकेच्या कारभाऱ्यांना हात जोडून विनंती;राजे हो, आता तरी मौन सोडा !
सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा नगरपालिका लाच प्रकरणावरून साविआ – नविआ यांच्यात उठलेला धुरळा काही खाली बसण्याचे नाव घेईना. गेली दोन – तीन दिवसांपासून दोन्ही आघाड्यांकडून होत असलेल्या पत्रकबाजीमुळे सातारकरांची करमणूक होत असेल असे जर या पत्रकबहाद्दरांना वाटत असेल तर तो त्यांचा भ्रम आहे. दोन्ही आघाड्यांकडील कारभाऱ्यांनो, सातारा आणि सातारकर नागरिकांना पत्रकबाजीची नव्हे तर विकासकामांची गरज आहे हे तुमच्या कधी लक्षात येणार ? म्हणून दोन्ही राजांनी या पत्रकबाजीला आवर घालून आता तरी मौन सोडावे, अशी मागणी जनतेतून होत आहे.

कचरा उचलण्याच्या ठेक्यातील डिपॉझिट रक्कम परत मिळवून देण्यासाठी लाच मागताना पालिकेचा उपमुख्याधिकारी अँटी करप्शन ब्युरोच्या (एसीबी) जाळ्यात सापडला आणि या पत्रकबाजीला तोंड फुटले. गेली दोन-तीन दिवसांपासून या गोष्टीला तर अक्षरशः उत आलाय. कधी साविआचं पत्रक तर कधी नविआचं !
या दोन्ही आघाड्यांचा कलगीतुरा इतका रंगला की तो आणखी रंगतदार होण्यासाठी आजी-माजी नगराध्यक्षांनी त्यात उडी घेतली. जो तो आपापल्या आघाड्या लढवत होता. कुणी म्हणतंय,’ सत्ताधाऱ्यांचा पालिका प्रशासनावावर अंकुश नाही,’ तर कुणी म्हणतंय,’ एक आंबा नासका निघाला म्हणून काय सर्वच आंबे फेकून देतं का कुणी ?’ तर कुणी म्हणतंय,’आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी..’

कधी यानं त्याची उणीधुणी काढायची तर कधी त्यानं याची; रोज-दररोज पत्रके रंगवायची आणि आम्हीच तेवढे धुतल्या तांदळाचे, अशी टिमकी वाजवत राहायची. अहो, पण हे कुठंवर चालणार ? तुमच्या पत्रकबाजीला भुलणारी ही सातारकर जनता तुम्हाला दूधखुळी वाटली की काय ? अहो सातारच्या कारभाऱ्यांनो, जनता जनार्दनाला सर्व काही कळतं हे तुम्हाला कधी कळणार ?
आरोप-प्रत्यारोप आणि एकमेकांवर चिखलफेक करून मूळ विषयाला कशी बगल द्यायची हे जरी तुम्हाला चांगलं ठाऊक असलं तरी जनता सुज्ञ आहे. ‘इकड-तिकडचं बोलण्यापेक्षा विकासाचं बोला. ही पत्रकबाजी थांबवा आणि विकासाची वाट धरा.

एकाच घरात नांदायचं आणि चौकात येऊन भांडायचं !

साविआ – नविआचं एक गणितच कळत नाही बुवा ! सत्तेत एकत्र नांदायचं आणि जरा कुणी कळ दाबली,की चौकात येऊन भांडायचं. गेल्या पालिका निवडणुकीत दोन्ही राजेंनी आपल्या आघाडीच्या माध्यमातून स्वतंत्र निवडणुका लढल्या. मात्र सातारा विकास आघाडीला बहुमत मिळाल्याने नगराध्यक्ष पदासह एकहाती सत्ता मिळवली. दरम्यान, साविआची एकहाती जरी सत्ता आली असली तरी काही दिवसांपूर्वी दोन्ही राजे भाजपात गेल्याने पालिकेत दोन्ही राजेंची सत्ता आहे असे चित्र निर्माण झाले. सध्या पालिकेत सध्या सातारा विकास आघाडी 22, नगरविकास आघाडी 12, भाजप 6 असे बलाबल आहे. मग आता दोन्ही राजे सत्तेत असताना दोन्ही आघाड्यांकडून ही एकमेकांवर
चिखलफेक होण्याचं कारणच काय ? त्यामुळे तुझं खरं की माझं खरं यावरून भांडत बसण्यापेक्षा आहे.त्या घरात एकत्रितपणे गुण्यागोविंदाने नांदा आणि सातारकरांचा विकास साधा. आता ही किमान अपेक्षा देखील सातारकरांनी व्यक्त करू नये ?


जरा विकासकामांवर कुणी तरी बोला…

यापूर्वी कुणी काय कामं केली आणि आता कोण काय कामं करतोय याचा जो तो पाढा वाचताना दिसतोय सातारकरांच्या वाट्याला विकासाच्या नावानं पहिले पाढे पंचावन्नच ! पालिकेच्या माध्यमातून आपण सातारकरांना रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण या मूलभूत व आवश्यक सेवा पुरविण्यासाठी आणखी काय करू शकतो यावर मात्र कुणीच काही बोलताना दिसत नाही.


राजे हो, आता सारं काही तुमच्या हाती !

पालिकेत सध्या जे काही अभद्र घडलंय आणि त्या अनुषंगाने पालिकेबाहेर जे काही पत्रकयुद्ध रंगलंय
ते थांबवण्यासाठी आता दोन्ही राजांनी पुढे यावं आणि
हे पत्रकयुद्ध पहिल्यांदा बंद करावं. सातारकरांना विकास हवाय आणि त्याकरिताच हे सारे कारभारी जनतेने पालिकेवर निवडून पाठवले आहेत, याची त्यांना तुम्हीच पुन्हा एकवार जाणीव करून द्या. राजे हो, आता सारं काही तुमच्याच हाती आहे.

उपमुख्याधिकाऱ्यासह तिघांना जामीन
सातारा पालिका लाचप्रकरणी अटकेत असलेले उपमुख्याधिकारी संचित धुमाळ, गणेश टोपे, प्रवीण यादव या तिघांना शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता काही अटी व शर्थींसह त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली. दरम्यान, या प्रकरणातील राजेंद्र कायंगुडे हा एक जण अद्याप पसार असून त्याचा शोध सुरू असल्याचे तपासी अधिकारी आणि सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक अशोक शिर्के यांनी दिली.

उपमुख्याधिकाऱ्याचा निलंबन प्रस्ताव ;
‘ते’ तीनही आरोग्य निरीक्षक अखेर निलंबित

सातारा पालिकेचे लाचखोर उपमुख्याधिकारी संचित धुमाळ याच्या निलंबनाचा प्रस्ताव मुख्याधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासन अधिकाऱ्यांकडे पाठवला आला असून सोमवारी तो नगरपरिषद संचालनालय (वरळी, मुंबई) येथे पाठवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासन अधिकारी रवी पवार यांनी दिली. दरम्यान, या प्रकरणात सहभागी असलेले राजेंद्र कायंगुडे, गणेश टोपे, प्रवीण यादव या तीनही आरोग्य निरीक्षकांना मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी निलंबित केले. आज शुक्रवारी ही निलंबनाची कारवाई करण्यात आल्याने पालिका वर्तुळात खळबळ उडाली.
दरम्यान, कोविड कक्षाची जबाबदारी प्रणव पवार यांच्याकडे देण्यात आली आहे तर आरोग्य विभागाचे कामकाज अतुल डिसले, सतीश साखरे व शैलेश अष्टेकर पाहणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.

error: Content is protected !!