सामान्य शिवसैनिकांना चिरडले जात असल्याचा पुरुषोत्तम जाधव यांचा आरोप

संघर्ष पाचवीलाच पुजल्याने वाई मतदारसंघात सवता सुभा मांडणार

खंडाळा,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : महायुतीच्या अंतर्गत तडजोडीत कायमच शिवसैनिकांना चिरडण्यात आले आहे. आपण गेल्या वीस वर्षात कायम भाजप -सेना युतीच्या वाढीसाठीच राबलो आहोत. मात्र आम्हाला डावलले जात असेल तर आम्ही आमची ताकद दाखवून देऊ व आपण लढवय्ये शिवसैनिक असल्याचे सिद्ध करून दाखवू. त्यासाठी वेगळी भूमिका घेऊ व सवता सुभा मांडू, अशी स्पष्ट भूमिका पुरुषोत्तम जाधव यांनी घेतली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण वाई- खंडाळा- महाबळेश्वर या राज्यातील सर्वात मोठ्या क्षेत्रफळाच्या मतदारसंघातून इच्छुक असल्याचे जाहीर करून श्री. जाधव यांनी ‘भूमिशिल्प’शी बोलताना सांगितले की, आपण २००९ मध्ये लोकसभा व विधानसभा तर २०१४ मध्ये अपक्ष म्हणून लोकसभेची निवडणूक लढवली. त्यावेळी मोदी लाटेचा प्रभाव असूनही दीड लाखाहून अधिक मते आपण मिळवली. पुढे शिवसेनेतून भाजपात प्रवेश केला आणि वाई मतदारसंघातून कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवली. प्रत्येक वेळी आपण पक्षाच्या व युतीच्या अस्मितेसाठी लढा दिला.यंदाच्या २०२४ मधील लोकसभेच्या निवडणुकीवेळी श्री. छ. उदयनराजे भोसले यांना भाजपाने उमेदवारी दिली. त्यावेळीही आपण प्रामाणिकपणे त्यांच्या विजयासाठी प्रयत्न केले. मात्र कोणताही राजकीय गॉडफादर नसल्याने आणि राजकारणाचा वारसा नसल्याने प्रत्येक वेळी आम्हास डावलण्यात आले. प्रत्येक वेळी आमच्या नशिबी संघर्ष आला.

ऐनवेळी सर्वसामान्यांना चिरडण्याचाच प्रकार होत आला. मात्र आपण हिंदुहृदयसम्राट सरसेनापती स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक आहोत. आपण कायम जनतेच्या कल्याणासाठीच झटत आलो आहोत. राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्याचे सुपुत्र असल्याने त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर विकास कामे झालेली आहेत. त्यांच्या दूरदृष्टीतून जिल्ह्यात विकासकामांचा डोंगर उभा राहिला आहे. त्याचा लाभ निश्चितच या निवडणुकीत शिवसेनेला होऊ शकेल, मात्र महायुतीमध्ये कट्टर शिवसैनिकांना डावलले जात असेल तर आपण ते सहन करणार नाही. प्रसंगी आपण वेगळी भूमिका घेऊ, असे सांगत महायुतीच्या वाई मतदारसंघातून जाहीर झालेल्या मकरंद पाटील यांच्या विरोधात पुरुषोत्तम जाधव यांनी दंड थोपटले आहेत.

गेल्या तीन दशकांपासूनचा खंडाळा तालुक्यातील पाणी प्रश्न व नवरोजगार निर्मितीचा प्रश्न रखडलेला आहे.विद्यमान आमदारांना खंडाळा तालुक्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही, अशी टीका करून पुरुषोत्तम जाधव म्हणाले की, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांत प्रचंड नाराजी असून दोन साखर कारखान्यांचे अध्यक्षपद, गावातील सरपंचांसह बाजार समिती, जिल्हा मध्यवर्ती बँक आणि राज्यसभेची खासदारकी अशी सर्व पदे एकाच घरात केंद्रित झाल्याने सर्वसामान्यांना पदे भूषवण्याची संधी कधी मिळणार? सत्तेचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे, ही जनतेची आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांची खदखद व्यक्त करण्यासाठी आणि विजय मिळवण्यासाठीच आपण लढणार आहोत.

अडीच वर्षांपूर्वीच्या राज्यातील सत्तांतरानंतर पुरुषोत्तम जाधव यांनी सातारा जिल्ह्याची जबाबदारी समर्थपणे सांभाळली व जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी योगदान दिले सदस्य नोंदणी अभियानात मोठ्या प्रमाणावर शिवसैनिकांची नोंदणी केली मात्र तडजोडीच्या राजकारणात कायमच मुख्यमंत्र्यांच्या गटालाच महायुतीमध्ये डावलले जात आहे, त्यामुळे आता आपले अस्तित्व दाखवण्याची वेळ आली आहे, असे सांगून खंडाळा तालुक्यात सव्वा लाखाहून अधिक मतदार असून भूमिपुत्र म्हणून त्यांचा मला मिळणारा प्रतिसाद व महायुतीच्या माध्यमातून केलेल्या विकासकामांच्या बळावर आपण निवडणुकीला सामोरे जाऊ व यश मिळवूच,अशी खात्रीही श्री. जाधव यांनी व्यक्त केली आहे.

error: Content is protected !!