साताऱ्याचे तहसिलदार राजेश जाधव यांच्या तत्परतेने वाचविले दोघांचे प्राण

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : रस्त्याने जात असताना दुर्देवाने एखादा अपघात घडल्यास अपघातग्रस्तांना तातडीने मदतीचा हात द्या असे आवाहन पोलीस दल तसेच प्रशासनाकडून नेहमी केले जाते. त्यामुळे अपघातग्रस्तांना तातडीची मदत मिळण्याचे प्रमाण वाढले आहे. आज खुद्द तहसीलदार राजेश जाधव व त्यांचा चालक वसंत संकपाळ यांनी साताऱ्यातील ग्रेडसेपरेटरमध्ये अपघातग्रस्त झालेल्या दोघांना स्वत:च्या शासकीय वाहनातून जिल्हा शासकीय रुग्णालयात पोहोचवले. त्यांना वेळेवर उपचार मिळाल्याने दोन जखमींचे प्राण वाचले असून तहसीलदारांच्या या तत्परतेचे कौतुक होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, शनिवारी सकाळी ११.२० च्या दरम्यान सातारा येथील ग्रेड सेपरेटरमधून गोडोलीच्या दिशेने जात असताना ग्रेड सेप्रेटरमध्ये टू व्हीलर व पादचारी यांचा अपघात झाला होता. त्याच दरम्यान, सातारा तहसिलदार राजेश जाधव हे सातारा तहसील कार्यालयामधून जात असताना सदरील अपघात प्रथम दर्शनी लक्षात आले.त्यांनी क्षणाचाही विलंब न करता स्वतः अपघातग्रस्त अक्षय वसंत सुतार (रा. संभाजी नगर शिवराज पेट्रोल पंपच्या पाठीमागे, सातारा) व शिवाजी विष्णू साठे (वय ६०, रा. एकांबे ता. कोरेगाव ) या दोन्ही अपघातग्रस्तांना स्वतः गाडीत घेवून ते स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात प्रथम उपचारासाठी दाखल झाले.

या मदत कामात त्यांना शहर वाहतूक शाखेचे पोलीस राहुल भोये व संतोष पवार यांनी तत्काळ सहकार्य केले. तसेच तहसीलदार यांचे वाहन चालक वसंत संकपाळ यांनी पुढे होऊन अपघातग्रस्तांना मदत केली. त्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे आज दोन अपघातग्रस्तांचे जीव वाचले. या कार्याबद्दल तहसीलदार राजेश जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक होत आहे.

error: Content is protected !!