सातारा जिल्ह्यात १ ते ७ ऑगस्टदरम्यान महसूल सप्ताह : जिल्हाधिकारी संतोष पाटील

दाखले वाटप, अतिक्रमणमुक्ती मोहिमा, शिबिरे आणि महसूल अदालतींचे आयोजन; नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): महसूल विभागाच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी दरवर्षी १ ऑगस्ट रोजी ‘महसूल दिन’ साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर यंदा १ ते ७ ऑगस्टदरम्यान सातारा जिल्ह्यात महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून, या कालावधीत जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. नागरिकांनी या उपक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.

महसूल सप्ताहामध्ये विशेष शिबिरे, दाखले वाटप, महसूल अदालती, अतिक्रमणविरोधी मोहिमा, पाणंद आणि शिवरस्त्यांची मोजणी, वृक्षलागवड, तसेच विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या मोहिमेचे नियोजन करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, उपजिल्हाधिकारी महसूल विक्रांत चव्हाण यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते, तर उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

सप्ताहात १ ऑगस्ट रोजी महसूल दिन साजरा केला जाईल आणि या दिवशी महसूल प्रशासनातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात येईल. २ ऑगस्ट रोजी २०११ पूर्वीच्या रहिवासी अतिक्रमणधारकांना पट्टे वाटप, ३ ऑगस्ट रोजी पाणंद व शिवरस्त्यांची मोजणी, अतिक्रमण निष्कासन आणि वृक्षलागवड, तर ४ ऑगस्ट रोजी दाखले वाटप शिबिरे व घरकुल योजनांसाठी सरकारी जमिनीचे वाटप करण्यात येणार आहे. ५ ऑगस्ट रोजी DBT लाभार्थ्यांची यादी तयार करणे आणि घरभेटी मोहिम, ६ ऑगस्ट रोजी शासकीय जमिनीवरील अतिक्रमणांचे निष्कासन, शर्तभंग प्रकरणांची सोडवणूक, तर ७ ऑगस्ट रोजी महसूल अदालतीद्वारे प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यात येणार आहे.

विशेषतः १ ऑगस्ट २०२५ पासून महसूल कायद्यातील कलम १५५ अंतर्गत येणारे सर्व अर्ज केवळ ‘ई-हक्क पोर्टल’वरूनच स्वीकारले जाणार असून, नागरिकांनी सेतू केंद्रांमार्फत हे अर्ज दाखल करावेत, अशी माहितीही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिली. संबंधित प्रकरणांवर तहसीलदार आणि नगर भूमापन अधिकारी योग्य कार्यवाही करतील.

महसूल सप्ताहाच्या निमित्ताने प्रशासनाच्या नागरिकाभिमुख, पारदर्शक आणि गतिमान कारभाराला चालना मिळावी, हा यामागचा उद्देश आहे. त्यामुळे नागरिकांनी या आठवड्यात आपल्या विविध शासकीय कामांचा निपटारा करून उपक्रमांचा लाभ घ्यावा, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले.

error: Content is protected !!