उंब्रज येथील प्रचारसभेत शिंदेंना लोकसभेत पाठविण्याचे आवाहन
उंब्रज,(भूमिशिल्प वृत्तसेवा): आ.शशिकांत शिंदे हा सर्वसामान्यांमध्ये मिसळून काम करणारा लढवय्या नेता आहे. तो माथाडी कामगारांचा मुलगा असल्याने त्यांचे अनेकांशी जिव्हाळ्याचे संबंध असून त्यांच्याबद्दल लोकांना आस्था आहे. त्यांचे तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह म्हणजे शुभ लक्षण आहे. शशिकांत शिंदे हा सर्वसामान्यांचा कर्तुत्वान कार्यकर्ता असल्याने त्यांना केंद्रातुन आपले प्रश्न सोडवण्यासाठी लोकसभेत पाठवा, असे आवाहन उत्तर कराडचे आ. बाळासाहेब पाटील यांनी केले.
उंब्रज ता.कराड येथील बाजार तळामध्ये सातारा लोकसभा इंडिया आघाडीचे उमेदवार आ.शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ जाहीर प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी आ.बाळासाहेब पाटील बोलत होते. सभेप्रसंगी आ.शशिकांत शिंदे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, माजी सभापती मानसिंगराव जगदाळे, सविता बर्गे, देवराज पाटील, अजित चिखलीकर-पाटील, माजी पं. स. सदस्य सोमनाथ जाधव, कारखान्याचे संचालक डी.बी.जाधव, हंबीरराव जाधव, सौ.मनीषा देसाई, सौ.साधना ढवळे, सौ. साधना बर्गे, पै.संजय थोरात, माणिकराव पाटील लालासाहेब कवठेकर, अनिल देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे आ.बाळासाहेब पाटील म्हणाले, काँग्रेसच्या काळात या जिल्ह्यात मोठी धरणे, रस्त्यांचे जाळे, आरोग्य सुविधा, दवाखाने अशी महत्त्वाची कामे केलेली आहेत. तसेच उंब्रज भागाला जल सिंचनाच्या योजना करून नागरिक व शेतकऱ्यांना न्याय दिला आहे. परंतु नरेंद्र मोदींनी ‘अच्छे दिन आने वाले है’ असे सांगून लोकांच्या अपेक्षांचा भंग गेला आहे. देशातील महागाईने सर्वसामान्य कुटुंबे त्रस्त झालेली आहेत. तसेच कर स्वरूपात शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात पैसे घेऊन त्या बदल्यात वर्षाला फक्त सहा हजार रुपये देऊन लोकांची फसवणूक केले जात आहे. यामुळे मतदारांमध्ये सहानुभूतींची लाट असल्याने महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त लोकसभेत उमेदवार विजयी होणार आहेत. यावेळी भाजपाला देशात अपेक्षित असे यश मिळणार नाहीच, हे निश्चित आहे.
आ. शशिकांत शिंदे म्हणाले, जनतेसाठी आवाज उठवणारा व त्यांच्या मनातला कौल ओळखणारा खरा लोकनेता म्हणजे शरद पवार आहे. पावसातील पवार साहेबांच्या एका सभेमुळे देशाचे राजकारण बदलून गेले होते. परंतु आता पाऊस नसला तरी माणसांच्या सभेतील प्रचंड उपस्थितीमुळे मतांचा पाऊस पडणार आहे. आणि दिल्लीला आपली तुतारी नक्कीच वाजेल, असा मला विश्वास आहे. स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांची शक्ती व विचार जतन कसे करायचे हे येत्या निवडणुकीत दाखवून देतो. छत्रपती ही आमची युगपुरुष व प्रेरणा आहेत. यामुळे छत्रपती स्मारकाबाबत दिल्लीत आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही. चांगला खासदार होऊन माझ्या लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करेन.
पुढे आ.शशिकांत शिंदे म्हणाले, सध्याची जनता ही कोणाचेही ऐकत नसून जनतेच्या जे मनात असेल तेच करणार आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराशिवाय आपण निवडणूक जिंकू शकत नाही हे भाजप व त्याच्या उमेदवारांना कळाल्याने ते चव्हाण साहेबांचे विचार मांडत आहेत. सातारा जिल्ह्यातील खासदार हा जातीवादी व भाजपचा कधीच झाला नाही. तो जिवंतपणा ठेवून सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता आणि असेलच, हे दाखवून देणार आहे. लढाई ही दुसऱ्या स्वातंत्र्याची व लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आपण लढायची आहे. यासाठी माझ्यावर भरोसा ठेवून फक्त एकदा संधी द्या. दिल्लीत तुतारी वाजली तर महाराष्ट्राचा स्वाभिमान हा दाखवून देणार आहे.
You must be logged in to post a comment.