जाधवसाहेबांच्या योगदानाची पोचपावती सुनेच्या विजयातून द्या

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : ‘‘पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव आणि माझे वडील जिवलग मित्र होते. जाधवसाहेबांनी दिलेल्या योगदानाची पोचपावती त्यांच्या सूनबाई डॉ. स्मिता जाधव यांना प्रचंड बहुमताने विजयी करून द्यावी. अफवांवर विश्वास ठेवू नका. महायुतीच्या दोन्ही अधिकृत उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहा,’’ असे आवाहन खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केले.
पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव यांनी सातारा जिल्हा दौऱ्यादरम्यान शनिवारी उदयनराजे भोसले यांची ‘जलमंदिर पॅलेस’ या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी उदयनराजे यांनी त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट दिली. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी डॉ. जाधव यांच्या उमेदवारीला पाठिंबा व्यक्त करतानाच पदवीधर आणि शिक्षक या दोन्ही मतदारसंघांतील महायुतीच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले.
डॉ. जाधव यांच्या भेटीबाबत विचारले असता उदयनराजे म्हणाले, ‘‘जाधवसाहेब आणि आमच्या कुटुंबाचे जुने स्नेहसंबंध आहेत. माझे वडील आणि डॉ. स्मिता जाधव यांचे सासरे पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव हे जिवलग मित्र होते. जाधवसाहेबांच्या योगदानाची पोचपावती त्यांच्या सूनबाईंना विजयी करून मतदारांनी द्यावी.’’
‘दोन्ही उमेदवारांना निवडून आणण्याची जबाबदारी’
पदवीधर मतदारसंघातून डॉ. स्मिता जाधव आणि शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे हे महायुतीचे अधिकृत उमेदवार असल्याचे उदयनराजे यांनी स्पष्ट केले. ‘‘दोन्ही उमेदवारांना निवडून देण्याची आपली जबाबदारी आहे. त्यांना निवडून आणण्यात आम्ही कुठेही कमी पडणार नाही. मतदारांनी दोन्ही उमेदवारांना साथ द्यावी,’’ असे ते म्हणाले.‘‘मी स्मिताताईंना विजयाची शाल आणि बुके आधीच दिला आहे,’’ असे सांगत त्यांनी डॉ. जाधव यांच्या विजयाबाबत विश्वासही व्यक्त केला.
शिक्षक मतदारसंघात सानप यांना शिवसेनेच्या शिंदे गटाने दिलेल्या पाठिंब्याबाबत विचारले असता उदयनराजे म्हणाले, ‘‘तो त्यांचा निर्णय आहे. मला त्यावर भाष्य करायचे नाही. मला जे योग्य वाटते, त्यावर मी ठाम आहे. मी अधिकृत दोन्ही उमेदवारांच्या पाठीशी आहे. कुणीही अफवांना बळी पडू नये.’’
या वेळी जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती सुनील काटकर, प्रतापगड विकास प्राधिकरण समितीचे सदस्य काका धुमाळ, भाजपचे जिल्हा सरचिटणीस विक्रम पावसकर, महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रलेखा माने-कदम, महिला प्रदेश कार्यकारिणी सदस्या सुनेत्रा शहा, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा तेजस्विनी घोरपडे, सातारा जिल्हा चिटणीस नितीन कदम, ॲड. विनीत पाटील, सातारा शहर सरचिटणीस विक्रम बोराटे, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस अथर्व भोसले, वैशाली टंकसाळे, रीना भणगे, वैशाली भिलारे, तेजस्विनी दुर्गे आदी उपस्थित होते.
तसेच दीपक पाटील, अशोक शेडगे, मोनिका घोरपडे, मनोज शेंडे, सुधाकर यादव, विनोद मोरे, प्रशांत आहेरराव, सागर पावसे, पंकज चव्हाण, सुजाता राजेमहाडिक, अपर्णा वाळवे, शारदा वाघमोडे, विमल गोसावी, मारुती शिंदे, वैशाली राजेभोसले, आशा ढाणे, अनिता फरांदे, हेमलता भोसले, सविता फाळके, नासीर शेख, विजय बडेकर, किशोर पंडित आणि सागर भोसले उपस्थित होते.
You must be logged in to post a comment.