अखंड अभ्यास,सेवा,नम्रतेतूनच विद्यार्थी घडतो: यशेंद्र क्षीरसागर

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): अखंड अभ्यास करणे, समाजाची सेवा करण्याचा दृष्टिकोन विकसित करणे आणि कितीही मोठे झालो तरी अंगात नम्रता बाळगणे या सदगुणांमुळेच विद्यार्थी हा खऱ्या अर्थाने मोठा नागरिक घडतो; असे प्रतिपादन कोरेगाव पंचायत समितीचे सांख्यिकी विस्तार अधिकारी, कवी, लेखक आणि वक्ता यशेंद्र क्षीरसागर यांनी केले.

वाई तालुक्यातील पाचवड येथे तिरंगा इंग्लिश मीडियम स्कूलच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभवेळी आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख वक्ता म्हणून बोलत होते. यावेळी सुमारे चारशे विद्यार्थी ,सर्व शिक्षक व मुख्याध्यापक श्रीमती वैशाली कुंभार तसेच संस्थापक श्री युवराज पवार आणि केंद्रप्रमुख विठ्ठल माने उपस्थित होते.

यावेळी श्री. क्षीरसागर पुढे म्हणाले,” आदर्श भारतीय नागरिक होण्यासाठी ज्ञान आणि सेवा हे विद्यार्थ्यांनी अखंड व्रत म्हणून स्वीकारले पाहिजे. समाजाचा सातत्याने अभ्यास आणि निरीक्षण करावे. संत, समाजसेवक, समाजसुधारक यांचे कार्य कदापि विसरू नये. त्यांच्याविषयी माहिती काढावी. वाचन करावे. त्यामुळे आत्मविश्वास वाढतो. संपूर्ण समाज विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी तयार आहे .परंतु, तुम्ही मदत मागायला हवी. छत्रपती शिवाजी महाराज ,महात्मा फुले, महर्षी कर्वे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ,महात्मा गांधी, शहीद भगतसिंग, नेताजी सुभाषचंद्र बोस तसेच डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम, बाबा आमटे अशा महान व्यक्तींचा आदर्श समोर ठेवावा. आत्ताच्या काळात सुद्धा पद्मश्री, पद्मभूषण ,पद्मविभूषण प्राप्त अनेक महान व्यक्ती समाजात प्राणपणाने काम करीत आहेत. त्यांची माहिती काढावी. शक्य असल्यास त्यांना भेटावे. “माफी , आभार मानणे ,अभिनंदन करणे” या गोष्टींचा अवलंब आयुष्यभर करावा. त्यामुळे नम्रता अंगात येते. अहंकार दूर होतो. तसेच “त्याग आणि सेवा ” ही दोन सामाजिक तत्वे कायम पाळावीत .यश मिळणे अजिबात अवघड नाही. मात्र त्यासाठी चिकाटी आणि जिद्द हवी. यावेळी विठ्ठल माने तसेच इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची मनोगते झाली.

error: Content is protected !!