मे-जूनमधील मुसळधार पावसामुळे फुलांच्या बहराला पोषक वातावरण; पर्यटकांची वाढती गर्दी

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): जागतिक वारसा स्थळ आणि निसर्गसौंदर्याचा अद्वितीय आविष्कार असलेल्या कास पठारावर यंदा हंगाम सुरू होण्याच्या आधीच चवर जातीच्या शुभ्र फुलांनी निसर्गाचा नवा देखावा साकारला आहे. संपूर्ण पठारावर पांढऱ्या चादरीसारखा नजारा पाहायला मिळत असून, हा अपूर्व बहर पर्यटकांचे विशेष आकर्षण ठरत आहे.
यंदा पावसाळ्याची सुरुवात मे महिन्यातच झाल्यामुळे सातारा आणि आसपासच्या भागात वेळेआधीच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. विशेषतः जून महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे कास पठारावर चार ते पाच प्रकारची फुले उमलली होती. त्यात चवर फुलांचा बहर सध्या सर्वाधिक दिसून येत आहे.

सातारा शहरापासून अवघ्या २५ किलोमीटर अंतरावर असलेले कास पठार हे दरवर्षी ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीत बहरात येते. मात्र, यंदा वातावरणातील बदलामुळे आणि भरपूर पावसामुळे हंगामापूर्वीच निसर्गाचा रंगमंच खुलला आहे. लवकरच धनगरी फेटा, आमरी, कंदील, टोपली कारवी यांसारखी दुर्मिळ व आकर्षक फुलेसुद्धा येथे उमलण्याची शक्यता आहे.
मे महिन्यापासून पश्चिम महाराष्ट्रात सुरु असलेल्या सततच्या पावसामुळे पठारावर हिरवाईचं गालिचं पसरले असून, त्यामुळे फुलांना पोषक हवामान मिळाले आहे. यामुळेच पर्यटकांचीही ये-जा वाढू लागली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही कास पठारावरील निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी हजारो पर्यटकांची गर्दी होणार हे निश्चित आहे.

You must be logged in to post a comment.