डिजिटल मिडिया परिषदेचे पहिले राज्यव्यापी अधिवेशन १४ सप्टेंबरला

हजारोंच्या संख्येने उपस्थित राहा; प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे यांचे आवाहन

मुंबई,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न डिजिटल मीडिया परिषदेचे पहिले राज्यव्यापी अधिवेशन १४ सप्टेंबर २०२५ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे होत असून या अधिवेशनासाठी पत्रकार बांधवांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन डिजिटल मीडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे यांनी केले आहे. हे अधिवेशन मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त मा. श्री. एस. एम. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

डिजिटल पत्रकारांसाठी ऐतिहासिक पर्वणी

डिजिटल मिडियाला अधिक सक्षम बनवणे, तांत्रिक माहितीचे आदानप्रदान, पत्रकारांमधील सुसंवाद, तसेच डिजिटल पत्रकारांना भेडसावणाऱ्या अडचणींवर चर्चा या अधिवेशनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. अधिवेशनाचे उद्घाटन १४ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता छत्रपती संभाजीनगर येथील एकनाथ रंगमंदिर, क्रांती चौक येथे मान्यवरांच्या हस्ते होणार असून डिजिटल मिडिया क्षेत्रातील नामवंत व्यक्तींची व्याख्यानेही आयोजित केली आहेत.

उत्कृष्ट संपादकांचा सन्मान

यावेळी उत्कृष्ट युट्यूब चॅनल व न्यूज पोर्टल चालविणाऱ्या दहा संपादकांचा विशेष सन्मान केला जाणार आहे. सबस्क्राईबर्सची संख्या, व्ह्यूवर्स, तांत्रिक बाजू, बातम्यांची निवड आणि लोकांशी संवाद साधण्याची पद्धत या निकषांवर संपादकांची निवड करण्यात येणार आहे.

संघटनात्मक विस्तार

राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांत डिजिटल मीडिया परिषदेचे जाळे निर्माण करण्याचे काम सुरू आहे. सध्या ३० जिल्ह्यांत कार्यकारिण्या जाहीर झाल्या असून उर्वरित जिल्ह्यांत निवडी अंतिम टप्प्यात आहेत. महत्वाचे म्हणजे या अधिवेशनातच राज्य कार्यकारिणीची निवड करण्यात येणार आहे, अशी माहिती परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी दिली.

पत्रकारांच्या हक्कासाठी ठराव

सरकारने अलीकडेच डिजिटल मिडियाला जाहिराती देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्यामध्ये युट्यूब चॅनल्स व न्यूज पोर्टलचा स्पष्ट उल्लेख नाही. त्यामुळे ही बाब मुख्यमंत्र्यांच्या नजरेस आणून देऊन जाहिरात मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. तसेच डिजिटल पत्रकारांना अधिकृत अधिस्वीकृती मिळावी यासाठी अधिवेशनात ठराव मंजूर केला जाणार आहे.

डिजिटल माध्यमांना बळ

अनिल वाघमारे यांनी सांगितले की, प्रिंट व इलेक्ट्रॉनिक माध्यमातील अनेक प्रश्न अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेने मार्गी लावले आहेत. त्याचप्रमाणे डिजिटल मिडियालाही सन्मान व हक्क मिळवून देण्यासाठी डिजिटल मीडिया परिषद सातत्याने प्रयत्नशील राहील. त्यामुळे जिल्हा, तालुका पदाधिकारी यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व पत्रकारांना सहभागी करून अधिवेशनात मोठ्या संख्येने हजर राहावे.

error: Content is protected !!