कराड दक्षिणेतील काँग्रेस मतदारांचा मताधिक्य देण्याचा निर्धार : नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
कराड,(भूमिशिल्प वृत्तसेवा): येत्या लोकसभेत आपली लढाई ही सर्वसामान्य लोकांच्या हिताची आहे. जनतेने सर्वसामान्य उमेदवार देऊन निवडणूक हाती घेतल्याने ही निवडणूक सोपी झाली आहे. ज्यांनी माझ्यावर उपकार केले त्यांना मी कधीही विसरत नाही. येथील लोकांच्या नाराजीला फुंकर देऊन मला मतदार लोकसभेत पाठविणार आहेत. कराड दक्षिणेतील काँग्रेसच्या मतदारांनी बाबांच्या मार्गदर्शनाखाली मताधिक्य देण्याचा निर्धार केल्याने पृथ्वीराज बाबांचे मला दिल्लीला पाठवण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे, असे प्रतिपादन महाविकास आघाडीचे सातारा लोकसभेचे उमेदवार आ.शशिकांत शिंदे यांनी केले.
सैदापूर ता.कराड येथे बैठक व कोपरा सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी आ.शशिकांत शिंदे बोलत होते. याप्रसंगी माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण, रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ॲड.उदयसिंह पाटील, युवा नेते इंद्रजीत चव्हाण, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, सौ.सत्वशीला चव्हाण, वैशाली जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
आ.पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, माझ्या मुख्यमंत्री पदाच्या कालावधीत नगरविकास मंत्रालयाच्या माध्यमातून प्रचंड निधी उपलब्ध करून या भागाचा विकासातून कायापालट केला आहे. येथून पुढे ही सुबद्ध पद्धतीचे नियोजन करून आम्ही दोघेही या विभागातील गावोगावच्या विकासासाठी प्रयत्नशील राहू. यासाठी महाविकास आघाडीला जास्तीत जास्त मतदान करून साथ द्या. देशात असलेल्या वातावरणात परिवर्तन करायचे असेल तर महाविकास आघाडीची सत्ता असणे गरजेचे आहे.
ॲड.उदयसिंह पाटील म्हणाले, काँग्रेसच्या विचारसरणीमुळे देशाला स्वातंत्र्य मिळाल्याने देशाची खऱ्या अर्थाने जडणघडण झाली आहे. काँग्रेसच्या विचारसरणीची पाठराखण करणे हे आपले कर्तव्य आहे. कराड तालुका हा यशवंत विचारांचा पाईक आहे. सध्या लोकांची परिवर्तन करण्याची मानसिकता असल्याने आपला उमेदवार जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून येईल याची मला खात्री आहे.
यावेळी मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, माजी सरपंच सचिन पाटील, वैशाली जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.
दरम्यान आ. शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ आ.पृथ्वीराज चव्हाण,ॲड.उदयसिंह पाटील,व मान्यवरांच्या उपस्थितीत कराड दक्षिणेतील घोणशी, वहागांव, मलकापूर, गोवारे,आटके, वारुंजी,विंग येथील गावांमध्ये बुथ व कार्यकर्त्यांच्या भेटी, बैठक व कोपरा सभा उत्साहात पार पडल्या.यावेळी आनंदराव देसाई, तानाजी माळी, नितीन जाधव, संजय जाधव, सुनील जाधव, अनिल जाधव, पांडुरंग जाधव, मुन्नाभाई, धनाजी जाधव व मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक नितेश जाधव यांनी केले. आभार विवेक जाधव यांनी मानले.
You must be logged in to post a comment.