कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी: खा.उदयनराजे

पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील कार्यकर्ता संवाद मेळाव्यात मार्गदर्शन

पुसेसावळी,(भूमिशिल्प वृत्तसेवा): युतीचे सरकार १९९५ मध्ये सत्तेवर असताना माझ्या मागणीनुसार कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना झाली. या महामंडळाच्या माध्यमातून जिल्ह्यात ११ धरणे बांधली गेली. जिल्ह्यातील दुष्काळी भागाचा कलंक पुसण्याचे मोठे काम त्यामुळे झाले आहे. उर्वरित भागात देखील लवकरच पाणी पोचेल असा विश्वास महायुतीचे लोकसभेचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला.

पुसेसावळी ता. खटाव येथे जिल्हा परिषद गटाच्या संवाद मिळाव्यात उदयनराजे बोलत होते. भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख मनोजदादा घोरपडे, प्रताप शिंदे, जिल्हा परिषदचे माजी सभापती भीमराव पाटील, सुशांत निंबाळकर ,भाजप महिला आघडीच्या राज्याध्यक्ष चित्रलेखा माने कदम, विक्रमबाबा कदम, रामकृष्ण वेताळ, मयूर बनसोडे , नवल थोरात, संग्रामराजे भोसले, श्रीकांत पिसाळ श,ज्ञानेश्वर पवार, पंढरीनाथ भाग्यवंत, संतोष कणसे, धनाजी पाटील, राजू बर्गे, महेश पाटील, नानासाहेब घाडगे, रामचंद्र जाधव, अनिल पिसाळ, विक्रमबाबा कदम, अकबर बागवान, अमोल कदम, महेश पाटील, संग्राम राजेभोसले, हिम्मतराव माने, ज्ञानेश्वर पवार,कुणाल गडांकूश आदी उपस्थित होते.

उदयनराजे पुढे म्हणाले, वर्षानुवर्षांच्या निर्विवाद सत्तेमुळे काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना अहंकार वाढला होता. कुठलेही विकास काम न करता लोक आपल्याला निवडून देतात. दगडाला शेंदूर फासून तो आपण निवडणुकीत उभा केला तरी हे लोक मेंढरा सारखी येऊन आपल्याला मतदान करतील, असे कुचेष्टेने ते बोलायचे. त्याच काळात साताऱ्यासह पश्चिम महाराष्ट्रातील सिंचनाचा प्रश्न घेऊन मी पाठपुरावा करत होतो. त्याचवेळी युतीचे सरकार राज्याच्या सत्तेवर आले होते. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे राज्याचे उपमुख्यमंत्री असताना मी त्यांच्याकडे गेलो. सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भागाला पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावे यासाठी कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना करावी अशी मागणी केली होती.

स्व.गोपीनाथ मुंडे यांनी त्यावेळी महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ स्थापन करण्यासाठी मंजुरी मिळवली. त्यावेळी साडेबारा कोटींचा निधी या महामंडळाला वर्ग करण्यात आला. त्यावेळी मी सिंचनाचा मुद्दा उपस्थित केला नसता तर आजची जी परिस्थिती पुसेसावळीसह परिसरात पाहायला मिळाली नसती. माझे कर्तव्य मी त्या काळात केले. उर्वरित विकासकामे मार्गी लावण्यासाठी निवडणुकीत लोकांच्या पाठबळाची गरज असते. या निवडणुकीत तुम्ही हे पाठबळ मला द्याल याची मला खात्री आहे.

धैर्यशील कदम म्हणाले, कराड उत्तरचे सध्याचे आमदार पालकमंत्री झाल्यानंतर त्यांनी पुसेसावळी परिसरातील विकास कामांकडे दुर्लक्ष केले. हणबरवाडी, धनगरवाडी, अंतवडी धरणांची कामे करावी अशी मागणी आणि वर्षांपासून होते. मात्र या मागणीकडे संबंधितांनी दुर्लक्ष केले. स्वतः काही करायचं नाही दुसऱ्याला हसायचे असा प्रकार विद्यमान आमदारांनी केला. तरीही जनतेच्या पाठबळावर भाजपच्या माध्यमातून आम्ही या परिसरात विकास कामे केली. मागील निवडणुकीत छत्रपती उदयनराजेंचा झालेला पराभव सर्वांचे जिव्हारी लागलेला आहे. काही निवडणुकीत अंडी- मटन देणाऱ्या, पैसे वाटणाऱ्यांना भूलून मते देऊ नका. आता चुकलो तर काळ माफ करणार नाही. या परिसरातून जास्तीचे लीड हे उदयनराजेंना देण्यासाठी सज्ज रहा.

संग्राम राजेभोसले म्हणाले, उदयनराजेंच्या माध्यमातून नरेंद्र मोदींचे हात मजबूत करायचे आहेत. गावकी- भावकीसाठी ही निवडणूक नाही, तर देशाचे भवितव्य ठरविण्याची ही लढाई आहे. उदयनराजेंना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायचे आहेत.

डॉ. महेश गुरव म्हणाले, कुठलीही वस्तू खरेदी करताना आपण दहा वेळा विचार करतो, चौकशी करतो आता तर आपल्या सर्वांचे भवितव्य ठरवणारी ही निवडणूक आहे. या निवडणुकीत गाफील राहून चालणार नाही. शौचालयाच्या पैशांत घोटाळा करणाऱ्या व्यक्तीला निवडून द्यायचा की तुमच्या भवितव्याचा विचार करणाऱ्या व्यक्तीला हे प्रत्येक जणांनी ठरवावं. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्यासाठी आपल्या पैकी अनेकांच्या पिढ्यांनी बलिदान दिले आहे. आता त्यांचे थेट वारस असलेल्या खासदार उदयनराजेंना लोकसभेत पाठवण्यासाठी मतदान करायचे आहे.

मनोजदादा घोरपडे म्हणाले, उदयन महाराज कृष्णा खोरेचे उपाध्यक्ष असताना जिल्ह्यातील धरणे व कालव्यांच्या कामाला गती मिळाली. त्या उलट काँग्रेसने या योजना धुळखात ठेवल्या होत्या. २०१४ मध्ये नशिबाने युतीचे सरकार सत्तेवर आले, त्यानंतर या योजना मार्गी लावण्याचे काम सुरू केले, पाणी मिळाले. महायुतीचे आमदार, खासदार या परिसरात असतील तर पाण्याचे दुर्भिक्ष निश्चितपणे थांबेल. उदयनराजेंना मते म्हणजे नरेंद्र मोदींना पंतप्रधान करणे होय.

चिमुकली कडून उदयनराजेना विजयासाठी शुभेच्छा पुसेसावळी येथील सुहाना बागवान हिने व्यासपिठावर जाऊन उदयनराजेंच्या हातात कॅडबरी देत लोकसभा निवडणुकीतील विजयासाठी त्यांना गोड शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!