स्व.विलास काकांचे विचार जागृत ठेवण्यासाठी महाविकास आघाडीला विजयी करा :आ.पृथ्वीराज चव्हाण

उंडाळे येथे विराट जाहीर सभा; आ.शिंदे यांना मताधिक्य देण्याचा निर्धार

उंडाळे,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : स्व. विलास काकांनी या भागात पाणी आणून संपूर्ण भाग सुजलाम सुफलाम केला. त्यांनी आयुष्यभर काँग्रेसची विचारधारा जोपासली. कधीही जातीयवादी प्रवृत्तीला थारा दिला नाही. त्यांच्या विचारांची जपणूक करीत स्वाभिमान व निष्ठा जागृत ठेवण्यासाठी महाविकास आघाडीला विजयी करा असे आवाहन माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

उंडाळे ता.कराड येथे महाविकास आघाडीचे सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आ.शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.यावेळी उमेदवार आ.शशिकांत शिंदे ,प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस ॲड. उदयसिंह पाटील, खा श्रीनिवास पाटील, कराड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे,किसनराव जाधव, अनिल मोहिते, रोहित पाटील, संभाजी चव्हाण, शिवाजीराव मोहिते, नरेंद्र पाटील, लक्ष्मण देसाई यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

आ. चव्हाण म्हणाले, आपला देश हुकूमशाहीकडे निघाला आहे. मोदींनी दहा वर्षात काय विकास केला हे त्यांना सांगता येत नाही. त्यामुळे ते अन्य विषयावर बोलत आहेत. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यात मोदींचा राजाश्रय होता. ज्या आमदारांनी गद्दारी केली त्यांच्याबद्दल लोकांमध्ये मोठी चीड आहे. या मतदारसंघातील प्रतिस्पर्धी उमेदवाराला तीन वेळा निवडून दिले परंतु त्यांनी कधीही जनतेशी संपर्क ठेवला नाही. जातिवादी पक्षामध्ये ते गेले. गेल्या निवडणुकीत खा. शरद पवार यांनीच त्यांना उमेदवारी दिल्याबद्दल चूक कबूल केली होती.कराड दक्षिण मतदार संघाने जातीयवादी विचाराला थारा दिला नाही. स्व. विलास काकांनी एकता व अखंडतेचा संदेश देऊन काँग्रेसचे विचार जोपासले हाच विचार पुढे नेण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांना कराड दक्षिण मधून सर्वाधिक मताधिक्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आ.शशिकांत शिंदे म्हणाले, कराड दक्षिण ही निष्ठावंतांची खाण आहे. स्व.विलासकाकांचे मला विधानसभेत काम करताना उल्लेखनीय मार्गदर्शन मिळत होते. त्यांचे विचार ही आमची प्रेरणाशक्ती आहे. या निवडणुकीत ॲड.उदयसिंह पाटील यांच्यासारखे नवीन सहकारी मिळाले इथून पुढे पृथ्वीराज बाबा आणि आम्ही त्यांना ताकद देऊन स्व. विलास काकांचा स्वाभिमान आणि निष्ठा जोपासण्याचा प्रयत्न करणार आहोत. कराड दक्षिण मतदार संघच या निवडणुकीचा निकाल लावेल असे सांगून सर्वसामान्य कुटुंबातील माथाडी कामगाराच्या मुलाला जनतेच्या प्रश्नांसाठी लोकसभेत पाठवा असे त्यांनी आवाहन केले.

ॲड.उदयसिंह पाटील म्हणाले, उंडाळे गावाच्या भूमीतून स्वातंत्र्याची विचारसरणी जोपासण्याचा प्रयत्न झाला. स्व.काकांनी ३५ वर्षे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना विकासाची जाळे निर्माण करून काँग्रेस पक्षाचे विचार समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवले. सर्वसामान्यांचे अधिकार अबाधित रहावेत, संविधानाची पायमल्ली होऊ नये आणि जिल्ह्याच्या विकासाची व्हिजन पूर्ण व्हावे यासाठी महाविकास आघाडीच्या पाठीशी राहून या मतदारसंघातील पुरोगामी विचारसरणीचा पाया भक्कम करूया असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी प्रा. धनाजी काटकर, डॉ. सुधीर जगताप, अजितराव जगताप राजेंद्र शेलार, अजित पाटील चिखलीकर ,आम आदमी पार्टीचे अमित खताळ यांनी मनोगत व्यक्त केले मनोहर शिंदे यांनी आभार मानले.

मताधिक्यासाठी गावागावात स्पर्धा…

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कराड तालुका महाविकास आघाडीच्या वारुंजी विभागातील कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न झाला.

या मेळाव्यात वनवासमाची, खोडशी, गोटे, मुंडे ,वारुंजी येथील काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कराड दक्षिणचे तालुकाध्यक्ष मनोहर शिंदे म्हणाले, कराड दक्षिण हा काँग्रेसचा बालेकिल्ला असून येथे यशवंत विचारांचे पाईक आहेत. लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या भाजपला या निवडणुकीतून हद्दपार करण्यासाठी या गावातील मतदारांनी विडा उचलला असून महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांना मताधिक्य देण्यासाठी गावागावात स्पर्धा सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

error: Content is protected !!