डॉ.अतुल भोसले यांनी साधेपणाने दाखल केला उमेदवारी अर्ज
कराड,(भूमिशिल्प वृत्तसेवा):डॉ.अतुल भोसले यांनी कराड दक्षिण मतदारसंघात कोट्यावधींच्या निधीतून विकासकामे केली आहेत. जनतेनेही त्यांच्या कामाची पोहोचपावती मतदानातून द्यावी. कराड दक्षिणमध्ये परिवर्तन करण्याची ही संधी असून या ठिकाणी डॉ. अतुल भोसले यांचा विजय निश्चित आहे, असा विश्वास खा.उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला.
भारतीय जनता पार्टीचे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार डॉ. अतुल भोसले यांनी खा. उदयनराजे भोसले व कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसलेयांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी वारकरी, माजी सैनिक, शेतकरी आणि माता-भगिनींच्या उपस्थितीत अगदी साधेपणाने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत खा. उदयनराजे बोलत होते. यावेळी उमेदवार डॉ. अतुल भोसले, विक्रम पावसकर, आप्पा माने यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
उदयनराजे म्हणाले, काँग्रेसने त्यांच्या सत्ताकाळात लाडकी बहीण योजना का राबवली नाही? एखादा प्रोजेक्ट लांबणीवर पडल्याचे खापर अजित पवार यांच्यावर फोडले गेले. त्यामुळे भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर त्यांना दोषी मानता येणार नाही. राष्ट्रवादीने सत्ताकाळात प्रकल्प रखडवले, नवीन योजना आणल्या नाहीत, विकास खोळंबला. त्यामुळेच एकेकाळचा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आता भाजपमय झाला आहे.निवडणुकीच्या तोंडावर फुटाफुटीचे प्रकार घडत आहेत. परंतू लोक त्यांना स्वीकारणार नाहीत. अशांना खरंतर नोबेल पारितोषिक द्यायला हवे, असे टिप्पणीही त्यांनी यावेळी केली.
डॉ.अतुल भोसले म्हणाले, गेल्या पाच वर्षांत महायुती सरकारकडे आपण मागितलेल्या विकासकामांसाठी आतापर्यंत एकूण ७४५ कोटी ८७ लाख रुपयांचा भरघोस निधी दिला आहे. त्यातील बहुतांश कामे आज पूर्णत्वास आली असून काही प्रगतीपथावर आहेत. कराडमधील शिवाजी स्टेडियमसाठी ९६ कोटींच्या निधीची तरतूद आहे. परंतू विरोधकांनी केवळ दहा लाखांची तरतूद असल्याचे जाहीर व्यासपीठावर सांगितले. स्वतःला ‘मोठा नेता’ समजणाऱ्यांनी शासन निर्णय न पाहता असे वक्तव्य करणे त्यांना शोभत नाही, असा टोला त्यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव न घेता लगावत आतापर्यंत महायुती सरकारच्या माध्यमातून झालेल्या घोषणा व निधीच्या तरतुदीबाबत सर्वांसमोर पुराव्यांनिशी आकडेवारी सांगितली. तसेच पृथ्वीराज चव्हाण यांनी लाडकी बहीण योजनेवर केलेल्या वक्तव्याचा समाचारही त्यांनी यावेळी घेतला.
कराडच्या एमआयडीसीची सुधारणा करून प्रशस्त रस्ते, सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. नवीन उद्योग व गुंतवणूक करून रोजगार निर्मिती करण्यावर भर देण्यात येईल. यशवंतराव चव्हाण यांच्या भूमीत त्यांनी घालून दिलेल्या आदर्शनुसार विकासनिधी आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. कराड दक्षिणचा कायापालट करणार असून कराडला रिंग रोड करण्याचा प्रयत्न राहील. नॅशनल हायवेपासून खोडशी ते कराड असा नवीन पुल उभारण्याचा अजेंडा आहे. त्याचबरोबर कृषीवर आधारित उद्योगधंदे निर्माण करणे, कृष्णा कारखान्यामार्फत इंडियन ऑईलच्या माध्यमातून बायो सीएनजी प्रकल्प उभारून रोजगार निर्मिती करणे, ग्रामीण भागातील प्रलंबित प्रश्न सोडवणे आणि अध्यात्मिक पर्यटन करण्यावर भर देण्यात येणार आहे, असे सांगून कराड दक्षिणमधील भाजपमध्ये एकमत आहे. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत, नव्हते आणि राहणार नाहीत, असेही डॉ. अतुल भोसले यांनी स्पष्ट केले.
दरम्यान डॉ. अतुल भोसले यांनी विक्रम पावसकर यांचा विधान परिषदेचा पत्ता कट केला. अशी सोशल मीडियावर पोस्ट फिरत आहे. यावर बोलताना विक्रम पावसकर यांनी भाजपमध्ये अशी प्रक्रिया नसल्याचे सांगितले. शिवाय डॉ. अतुल भोसले हे विधानसभेत जाणार असून तेच माझ्यासाठी शब्द टाकतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
You must be logged in to post a comment.