मुर्दाड प्रशासन आणि बहिरं सरकार!

लाँग मार्चनंतर ‘गायरान’साठी शेतकऱ्यांचे सरकारला थेट आव्हान; ९ ऑगस्टला मंत्रालयावर हल्लाबोल

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा): गायरान जमीनी खासगी ठेकेदारांना नाममात्र भाड्याने देण्याच्या सरकारच्या धोरणांवर थेट प्रहार करत शेतकऱ्यांनी आता निर्णायक लढाईचा इशारा दिला आहे. महसूल आणि महावितरण विभागाच्या भोंगळ कारभाराविरोधात पर्यावरण प्रेमी, सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांच्या नेतृत्वाखाली ‘गायरान वाचवा’ मोहिमेंतर्गत कराड ते सातारा लाँग मार्च काढण्यात आला. मात्र, प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने शेतकरी अधिक आक्रमक झाले असून, ९ ऑगस्ट या क्रांतिदिनी मंत्रालयावर हल्लाबोल करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

दरम्यान, गायरान जमीन ही गावकऱ्यांची असते, सरकारच्या मालकीची नाही. ही जमीन नाममात्र भाड्यात महावितरणला देऊन, त्यांनी ती खासगी कंपन्यांच्या घशात घालण्याचा डाव आखला आहे. आम्ही हा डाव हाणून पाडल्याशिवाय थांबणार नाही. सरकारला जागं केल्याशिवाय माघार नाही, असा थेट इशारा सुशांत मोरे यांनी दिला.

स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीला संघर्षाची ठिणगी

गायरान वाचवण्यासाठी, तसेच शासनाला सुबुद्धी द्यावी आणि हा प्रकल्प त्वरित रद्द करावा, यासाठी शेतकरी, युवक आणि महिलांनी स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीदिनी कराड येथील स्मारकास अभिवादन करून लाँग मार्च सुरू केला. कराडपासून निघालेला हा लाँग मार्च साताऱ्यातील शिवतीर्थ येथे पोहोचला. मात्र, महसूल आणि महावितरण विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

गायरान जमीन हडपण्याचा डाव; शेतकऱ्यांचा एल्गार!

शासनाने राज्यभरातील हजारो एकर गायरान जमीन महावितरणला दिली, मात्र त्यानंतर महावितरणने ही जमीन खासगी ठेकेदारांना सुपूर्द केली. यामध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार असून, शेतकऱ्यांना हक्काच्या जमिनीतून बेदखल करण्याचा हा कट आहे, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. अनेक गावांनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला असतानाही सरकारने ठेकेदारांच्या बाजूने भूमिका घेतल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आता निर्णायक संघर्ष पुकारला आहे.

…आता आम्ही मागे हटणार नाही!

मोरे पुढे म्हणाले, महसूल आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांना आम्ही वारंवार भेटलो. त्यांना आम्ही मागण्यांचे निवेदने दिली, पण कुणीही दखल घेतली नाही. उलट हे अधिकारी शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न करत आहेत. शासन-प्रशासन शेतकऱ्यांच्या अंगावर येत असेल, तर आम्ही शांत बसणार नाही. हा लढा थेट मंत्रालयाच्या दारात जाऊन लढला जाईल.

महसूल आणि महावितरणच्या भूमिकेचा निषेध; पोलीस दलाचे आभार

महसूल आणि महावितरणच्या मुर्दाड अधिकाऱ्यांनी आंदोलनाकडे पाठ फिरवल्याने आंदोलनकर्त्यांनी संताप व्यक्त केला. मात्र, या आंदोलनादरम्यान पोलीस दलाने सहकार्य केले, त्याबद्दल त्यांनी पोलीस प्रशासनाचे आभार मानले.

शेतकऱ्यांचा संघर्ष; प्रशासन गप्प

माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून बुधवार, १२ मार्च रोजी कराड येथून सुरू झालेल्या शेतकऱ्यांच्या लाँग मार्चकडे शासन आणि प्रशासनाने पूर्णतः दुर्लक्ष केले आहे. साताऱ्यात शुक्रवारी दि. १४ मार्च रोजी म्हणजेच तिसऱ्या दिवशी सर्व शेतकरी आपल्या मागण्यांसाठी पायदळ प्रवास करत पोचले तरीही प्रशासनाने त्यांची दखल घेतली नाही. शासनाच्या असंवेदनशील आणि निष्क्रीय भूमिकेमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.

९ ऑगस्टला मंत्रालयावर हल्लाबोल; मोटारसायकल रॅलीचा इशारा!

सरकारने यावर कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही, तर ९ ऑगस्ट क्रांतिदिनी साताऱ्यातील शिवतीर्थ येथून मंत्रालयावर मोटारसायकल रॅली काढली जाणार आहे. १५ ऑगस्टपर्यंत हा लढा अधिक तीव्र केला जाईल, असे मोरे यांनी स्पष्ट केले. हा सौरऊर्जा प्रकल्प केवळ मोठ्या कंपन्यांना फायदा मिळवून देण्यासाठी असून, यातून पर्यावरणाची हानी आणि शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे निवृत्त न्यायमूर्तींच्या समितीमार्फत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून प्रकल्प रद्द करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

लाँग मार्चला साताऱ्यात उत्स्फूर्त पाठिंबा

कराडहून निघालेल्या लाँग मार्चने साताऱ्यात प्रवेश केल्यानंतर विविध संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी या लाँग मार्चचे जोरदार स्वागत केले. ‘गायरान वाचवा’ मोहिमेस विविध संघटनांनी पाठिंबा दर्शवत, हा लढा केवळ शेतकऱ्यांचा नसून संपूर्ण समाजाचा असल्याचे स्पष्ट केले.साताऱ्यातील शिवतीर्थ येथे आंदोलनाचा समारोप झाल्यानंतर अनेकांनी शासनाच्या धोरणांवर कठोर शब्दांत टीका केली. गायरान जमीन खासगी ठेकेदारांच्या घशात घालण्याचा सरकारचा डाव हाणून पाडण्यासाठी व्यापक संघर्ष आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी संयुक्त लढ्यासाठी शेतकरी, युवक, आणि विविध संघटनांनी एकजूट होण्याचा निर्धार व्यक्त केला.

दरम्यान, कराड ते सातारा लाँगमार्चमध्ये शिवाजी माने, वसंत आबा, महादेव सावंत, चंद्रकांत सावंत यांच्यासह गोरेगाव, वांगी, शिरसवडी, सांगली, राजाचे कुर्ले, कुमठे, भाकरवाडी, शेणोली, नांदगाव, वडुथ आदी परिसरातील शेतकरी, नागरिकांनी सहभागी होऊन सक्रिय सहभाग नोंदवला.

error: Content is protected !!