श्री ज्ञानेश्वरी : मानवी जीवनाचा सार्वकालिक दीपस्तंभ : यशेंद्र क्षीरसागर

कोरेगाव येथे भक्तिमय वातावरणात पारायण सोहळ्यास प्रारंभ

कोरेगाव, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : “श्री ज्ञानेश्वरी हा ग्रंथ मानवी जीवनासाठी सार्वकालिक दीपस्तंभ आहे. जीवनातील सर्व समस्यांची उत्तरे या विश्ववंद्य ग्रंथातून सहज मिळतात,” असे प्रतिपादन प्रसिद्ध वक्ते आणि संत साहित्य अभ्यासक यशेंद्र क्षीरसागर यांनी केले.

कोरेगाव येथील श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे कलशपूजन श्री. क्षीरसागर आणि महंत श्री. अशोक गिरी महाराज यांच्या हस्ते झाले. त्यानंतर आयोजित “श्री ज्ञानेश्वरीचे माहात्म्य” या विषयावर विचारमंथन करताना ते बोलत होते. प्रमुख वाचक सचिन महाराज निकम, विनायक साळुंखे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी श्री. क्षीरसागर म्हणाले, तरुण पिढीने संत साहित्यातून मार्गदर्शन घ्यावे. श्री ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, नामदेवांचे अभंग यांचा अभ्यास करण्यासाठी कोणतेही वयाचे बंधन नाही. अवघा संसार सुखाचा करण्याची प्रतिज्ञा श्री ज्ञानेश्वर माऊलींनी सोळाव्या वर्षी केली. यातून त्यांच्या विचारांचा विश्वव्यापकपणा दिसून येतो. जीवनात कसे आचरण करावे याचा मापदंड श्री ज्ञानेश्वरीने कायमस्वरूपी घालून दिला आहे.

पारायण सोहळ्याच्या निमित्ताने टाळ-मृदंगाच्या गजरात पंचपदी म्हणत नगरप्रदक्षिणा काढण्यात आली. वांगणा नदीच्या तीरावर गंगा पूजन आणि आरती करण्यात आली. श्री. क्षीरसागर आणि महंत अशोक गिरी महाराज यांच्या हस्ते विनापूजन, टाळ पताका, तुलसी पूजन करण्यात आले.

यावर्षी विघ्नहर्ता बचत गट, गायत्री बचत गट, माऊली भिशी गट आणि मोरया बचत गट यांच्या वतीने ७७ ज्ञानेश्वरी ग्रंथ माऊली चरणी अर्पण करण्यात आले. महिलांच्या हस्ते ग्रंथपूजन झाल्यानंतर वाचनास प्रारंभ करण्यात आला.

या भक्तिमय सोहळ्यास ग्रामस्थ, माता-भगिनी आणि तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण गाव भक्तिरसात न्हाऊन निघाले. या सोहळ्यातील पहिला दिवस अत्यंत उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विनायक साळुंखे यांनी केले.

error: Content is protected !!