महाकुंभ दुर्घटनेची जबाबदारी स्वीकारून पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा : डॉ. बाबा आढाव

साताऱ्यात परिवर्तनवादी कार्यकर्त्यांसोबत संवाद; देशातील वाढत्या सामाजिक अस्थिरतेबाबत तीव्र चिंता

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : प्रयागराज महाकुंभ मेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीत हजारो भाविक मृत्युमुखी पडले असण्याची शक्यता आहे, तसेच अनेकजण बेपत्ता आहेत. मात्र, शासन सत्य आकडेवारी लपवण्याचा प्रयत्न करत असून, प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. या दुर्घटनेसाठी केंद्र सरकार जबाबदार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि विचारवंत डॉ. बाबा आढाव यांनी साताऱ्यात केली.

आज (शुक्रवारी) कोल्हापूरला जात असताना डॉ. बाबा आढाव हे रिक्षा पंचायतीचे सरचिटणीस नितीन पवार आणि ओंकार मोरे यांच्यासह साताऱ्यात थांबले होते. यावेळी त्यांनी साताऱ्यातील परिवर्तनवादी कार्यकर्त्यांशी देशातील सद्यपरिस्थितीबाबत संवाद साधला.

फुले-शाहू-आंबेडकरवादी आणि परिवर्तनवादी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना डॉ. आढाव यांनी स्पष्टपणे सांगितले की, महाकुंभ मेळ्यातील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांची आणि बेपत्ता झालेल्यांची संख्या लपवण्याचा प्रयत्न सुरू आहे. यावरून सरकारची बेपर्वाई आणि निष्काळजीपणा स्पष्ट होतो. सरकारने तातडीने जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा दिला पाहिजे.

देशातील सद्यस्थितीबद्दल चिंता व्यक्त करताना डॉ. आढाव म्हणाले, सध्याच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीमुळे संविधान धोक्यात आले आहे. तरुण पिढीने निर्भय बनून रस्त्यावर उतरले पाहिजे आणि संविधान टिकवण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. धर्मांधतेच्या वाढत्या प्रभावाविरोधात आवाज उठवण्याची गरज आहे.

दरम्यान, डॉ. आढाव यांचा ९४ व्या वर्षीही उत्साह कायम असून, देशातील सामाजिक परिस्थितीबाबत ते अस्वस्थ असल्याचे आजच्या त्यांच्या संवादातून स्पष्ट झाले.

संवादाची सुरूवात डॉ.बाबा आढाव यांनी महात्मा फुले यांच्या “सत्य सर्वांचे आदी घर, सर्व धर्मांचे माहेर” या अखंडाच्या पठणाने केली. विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष विजय मांडके यांनी प्रास्ताविक केले.

यावेळी जयंत उथळे, मिनाज सय्यद, अरिफभाई बागवान, सुदामराव आवडे, शिरीष जंगम, दिलीप ससाणे, नारायण जावळीकर, प्रा. संजीव बोंडे, डॉ. राजश्री देशपांडे, नीलिमा देशपांडे, सलमा कुलकर्णी-मोरे, डॉ. धनंजय देवी, राहुल गंगावणे, महेश गुरव, सलीम आत्तार, ॲड. विकास उथळे, डॉ. गीतांजली पोळ, अभिजित शिंदे यांच्यासह विविध संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!