१२ विश्वविक्रमांसह जागतिक पातळीवर साताऱ्याचा सन्मान

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): साताऱ्याच्या डॉ. जान्हवी जयप्रकाश इंगळे यांनी योगविश्वात अभूतपूर्व विक्रम प्रस्थापित करत इतिहास रचला आहे. त्यांनी एकाच वेळी १२ वेगवेगळ्या योगासनांमध्ये जागतिक विक्रम करून आपले नाव अमेझिंग ओलंपिया कॅनडा बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये कोरले आहे. त्यांच्या या अद्वितीय यशाबद्दल त्यांना वर्ल्ड रेकॉर्ड प्रमाणपत्र आणि गोल्ड मेडल देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

डॉ. जान्हवी यांनी भुजंगासन, अंजनेयासन, भद्रासन, उष्ट्रासन, बालासन, फलकासन, उत्तान मंडूकासन, जानु सिरसासन, पर्वतासन, वृक्षासन, गुप्त पद्मासन आणि गोमुखासन या १२ आसनांमध्ये ठराविक वेळ स्थिर राहून आपला विक्रम प्रस्थापित केला. त्यांनी भुजंगासन ३ मिनिटे ९ सेकंद, अंजनेयासन १ मिनिट ८ सेकंद, भद्रासन ३० मिनिटे १० सेकंद, उष्ट्रासन २ मिनिटे ४ सेकंद, बालासन १० मिनिटे २७ सेकंद, फलकासन (प्लँक पोझ) १ मिनिट १ सेकंद, उत्तान मंडूकासन ७ मिनिटे ५ सेकंद, जानु सिरसासन १ मिनिट १२ सेकंद, पर्वतासन ३ मिनिटे ६ सेकंद, वृक्षासन ३ मिनिटे ६ सेकंद, गुप्त पद्मासन ७ मिनिटे १२ सेकंद आणि गोमुखासन १० मिनिटे १२ सेकंद यशस्वीरीत्या पूर्ण करून विक्रम रचला.

डॉ. जान्हवी यांनी यापूर्वीही विविध योगासनांमध्ये जागतिक विक्रम नोंदवले आहेत. त्यांनी सिद्धासन सलग ५ तास १ मिनिट १७ सेकंद धरून विक्रम केला आहे. त्यानंतर नऊवारी साडी परिधान करून १०,००० वेळा तितली क्रिया फक्त १ तास १९ मिनिटे ३४ सेकंदात पूर्ण केली होती. तसेच, सुप्त बद्धकोणासन सलग ८ तास १३ मिनिटे २१ सेकंद करण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर आहे.

‘जान्हवी कि योगशाळे’च्या संस्थापिका असलेल्या डॉ.जान्हवी या राष्ट्रीय योगा ब्रँड अँबेसिडर म्हणून देखील कार्यरत आहेत. योगविद्येच्या प्रसारासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी योगाभ्यासाकडे वळवले असून योगप्रसारासाठी त्या सातत्याने कार्यरत आहेत. त्यांच्या योगदानाची दखल घेत त्यांना आतापर्यंत ३५० हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. यामध्ये आंतरराष्ट्रीय योगिनी पुरस्कार (हरिद्वार), स्वामी विवेकानंद योग रत्न सन्मान, महर्षी घेरंड ऋषी सन्मान, महाराष्ट्र हिरकणी सन्मान, माँ जिजाऊ सन्मान, मेजर ध्यानचंद क्रिडा रत्न सन्मान, लंडन बुक ऑफ रेकॉर्ड पुरस्कार, महर्षी पतंजली योग रत्न सन्मान, विश्वरत्न सन्मान, महाराष्ट्र खेल पुरस्कार, प्राईड ऑफ इंडिया, द बेस्ट योग गुरू, आंतरराष्ट्रीय योगाचारिणी सन्मान, सातारा भूषण पुरस्कार, प्राईड ऑफ पुणे पुरस्कार अशा अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांचा समावेश आहे.

डॉ. जान्हवी यांच्या विक्रमी कामगिरीमुळे साताऱ्याच्या नावाचा जागतिक स्तरावर गौरव झाला आहे. योगप्रेमी, क्रीडाजगत आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीमुळे भारतीय योगशास्त्राचा नावलौकिक वाढला असून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
“हा क्षण माझ्यासाठी अत्यंत अभिमानाचा आणि भावनिक आहे. योग ही केवळ शारीरिक क्रिया नाही, तर तो एक जीवनशैली आहे. सातत्याने मेहनत, संयम आणि समर्पण यामुळेच आज हा ऐतिहासिक विक्रम साध्य करू शकले. हा विक्रम माझ्या गुरूंना, कुटुंबीयांना आणि माझ्या सर्व विद्यार्थ्यांना समर्पित करते. भारतीय योगशास्त्राचा जागतिक स्तरावर गौरव करणे, हीच माझी खरी जिद्द आहे. पुढेही योगाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी मी कटिबद्ध आहे.”
- डॉ. जान्हवी इंगळे

You must be logged in to post a comment.