‘सातारा आरटीओ’चे कामकाज सोमवारपासून पूर्ण क्षमतेने सुरू

सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा) : लॉकडाऊनमुळे काही अंशी सुरू असलेले सातारा परिवहन कार्यालयाचे (आरटीओ)कामकाज काही नियम आणि अटींसह सोमवार (दि. 22) जून पासून पूर्ण क्षमतेने सुरु होणार आहे, अशी माहिती उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत यांनी दिली. यामध्ये अनुज्ञप्ती, वाहन, परवानाविषयक कामे यांसह वायुवेग पथकाच्या कामांचाही समावेश आहे. 
अनुज्ञप्ती व वाहनविषयक कामाकरिता सारथी 4.0 व वाहन 4.0 प्रणालीवर आगाऊ वेळ घेण्याची तरतूद करण्यात आली आहे. तसेच पक्क्या अनुज्ञप्तीसाठी 30 सप्टेंबरपर्यंत वैधता वाढविण्यात आलेल्या शिकाऊ अनुज्ञप्तीधारकांना प्राधान्य देण्यात येणार आहे. योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाच्या नियोजित दिनांकाच्या एक दिवस अगोदर वाहनांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे. नवीन वाहन नोंदणी तसेच हस्तांतरण आणि इतर कामकाज यापूर्वीच सुरू झाले आहे. संगणकीय चाचणीवेळी घेण्यात येणारी दक्षता 
शिकाऊ अनुज्ञप्तीची संगणकीय चाचणी घेताना पुढीलप्रमाणे दक्षता घेण्यात येणार आहे. दोन अर्जदारांमध्ये किमान सहा फुटांचे अंतर ठेवण्यात येणार आहे. अर्जदार मास्क व हँन्ड ग्लोव्हज घालूनच कार्यालयात प्रवेश करतील याची दक्षता घेण्यात येणार आहे. तसेच पक्की अनुज्ञप्ती चाचणी घेण्याआधी, ड्रायव्हिंग स्कूलच्या वाहनाची व योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण करण्यासाठी आलेल्या वाहनांचे सॅनिटायझेशन केल्यानंतर अशा वाहनांची चाचणी घेण्यात येणार आहे. अनुज्ञप्ती वाहन व परवाना विषयक कामकाजाबाबत दैनंदिन नवीन शिकाऊ अनुज्ञप्ती 40, पक्की अनुज्ञप्ती 60 व योग्यता प्रमाणपत्राचे नूतनीकरण 50 या प्रमाणे कोटा निश्चित करण्यात आला आहे. ज्या नागरिकांचे कार्यालयात कामकाज नाही त्यांनी कार्यालयाच्या आवारात येऊ नये. तसेच कार्यालयात येणार्‍याा नागरिकांनी मास्क वापरणे व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे बंधनकारक आहे.




error: Content is protected !!