साताऱ्यात १५ जानेवारीला शिवस्वराज रथयात्रेचा शुभारंभ, ८ मार्चला टोकियोत शिवपुतळ्याचे अनावरण

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागतिक प्रचार आणि हिंदुत्व, स्वराज्य व मराठी संस्कृतीचा जागतिक विस्तार करण्याच्या उद्देशाने साताऱ्यातून “शिवस्वराज रथयात्रेचा” भव्य शुभारंभ होणार आहे. जपानमधील टोकियो येथे महाराजांचा भव्य पुतळा उभारण्याच्या अनुषंगाने या ऐतिहासिक उपक्रमाची सुरुवात होत आहे.

भारतातील बारा राज्यांमधून भव्य अश्वारूढ शिवपुतळ्याची रथयात्रा काढली जाणार आहे. या शिवस्वराज रथयात्रेचा प्रारंभ बुधवार दि. १५ जानेवारी रोजी सायंकाळी चार वाजता राजवाडा, गांधी मैदान (सातारा) येथून होणार आहे. तसेच छत्रपतींच्या पुतळ्याचे अनावरण शनिवार दि. ८ मार्च २०२५ रोजी जपानच्या राजधानी टोकियो येथे होणार असून, तेथील राजघराण्याच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे, अशी माहिती मराठा बिजनेस फोरमचे अध्यक्ष व विकसक श्रीधर कंग्राळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कंग्राळकर म्हणाले, हा कार्यक्रम शिवस्वराज रथयात्रा समिती, मराठा बिजनेस फोरम,आम्ही पुणेकर, एडोगावा इंडिया कल्चर सेंटर (EICC, जपान), ऑल जपान असोसिएशन ऑफ इंडियन्स (AJAI, जपान), तसेच अनेक शिवप्रेमी संघटना व सामाजिक संस्था, स्थानिक प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने नियोजित करण्यात आला आहे.

मान्यवरांची उपस्थिती
या शिवस्वराज रथयात्रेचा शुभारंभ बुधवार दि.१५ जानेवारीला खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आमदार महेश शिंदे, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष व खासदार नितीन पाटील, जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक समीर शेख, मुख्याधिकारी अभिजित बापट यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
जपानमध्ये छत्रपतींचा पुतळा
या ऐतिहासिक शिवस्वराज रथयात्रेचा मुख्य हेतू जपानच्या टोकियो शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारणे हा आहे. या पुतळ्याचे शनिवार दि. ८ मार्च २०२५ रोजी सन्मानपूर्वक तेथील राजघराण्यातील सदस्यांच्या उपस्थितीत अनावरण केले जाणार आहे. या पुतळ्याच्या माध्यमातून महाराजांचे स्वराज्य स्थापनेतील योगदान जागतिक पातळीवर अधोरेखित होणार आहे. हा पुतळा तीन मीटर लांब व तीन मीटर उंच अश्वारूढ आहे, आणि त्याचे वजन अडीचशे किलोग्रॅम आहे. आम्ही पुणेकर संस्थेने यासाठी पुढाकार घेतला असून, मूळ भारतीय वंशाचे जपानचे आमदार योगेंद्र पुराणिक यांचा या कामात महत्त्वपूर्ण वाटा आहे.
रथयात्रेचा मार्ग
ही शिवस्वराज रथयात्रा सातारा, पुणे, मुंबई, सुरत, बडोदा, अहमदाबाद, उदयपूर, जयपूर, दिल्ली, कुरुक्षेत्र, आग्रा, लखनऊ, ग्वाल्हेर, भोपाळ, नागपूर, हैदराबाद, बेंगलोर, बेळगाव, पणजी, कोल्हापूर या शहरांमधून प्रवास करेल. या रथयात्रेदरम्यान विविध ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर आधारित कार्यक्रम, चर्चा सत्रे आणि सांस्कृतिक उपक्रमांचे सादरीकरण होणार आहे. रथयात्रेचे शेवटचे स्थान पुणे असेल. त्यानंतर विमान प्रवासाने पुतळा जपानला नेला जाईल, आणि टोकियो येथे राजघराण्याच्या उपस्थितीत आयोजित भव्य अनावरण सोहळा पार पडेल.
महान कार्याचा आरंभ
या स्मारकाच्या माध्यमातून फक्त सांस्कृतिकच नव्हे, तर मराठी उद्योजकतेला जागतिक स्तरावर व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे महान कार्य देखील घडणार आहे. शिवस्वराज्याच्या आदर्शाची आणि मराठी मातीची ओळख अबाधित ठेवत, हा कार्यक्रम जागतिक पातळीवर एक महत्वपूर्ण वळण देणारा ठरेल, असा विश्वास श्रीधर कंग्राळकर, जगदीश शिर्के, मनोज देशमुख, शरद काटकर, किरण पाटील, अमित बोडके, चंद्रसेन जाधव , संतोष शेडगे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला.
जपानमधील शिव स्मारक
या जपानस्थित शिव छत्रपती पुतळ्याच्या स्मारकात भारत इतिहास संशोधक मंडळ आणि भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेने अनेक मौल्यवान पुस्तकांसह इसवी सन १६२० ते इसवी सन १८४० दरम्यानची मौल्यवान पत्रे आणि पेंटिंग्जच्या खऱ्या प्रती देऊ केल्या आहेत. यामुळे जपानमधील देशवासियांना शिवरायांच्या विचारांची आणि पराक्रमाची देणगी सतत लाभेल. या स्मारकाच्या माध्यमातून शिवरायांच्या कार्याची आणि विचारांची जागतिक पातळीवर नवी ओळख निर्माण होईल.
महाराजांचे विचार आणि प्रेरणा जागतिक स्तरावर
छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदू धर्म, स्वराज्य आणि मराठी संस्कृतीचे प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या दूरदृष्टीच्या नेतृत्त्वातून जगभरातील तरुणांना प्रेरणा मिळावी, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. रथयात्रा हे माध्यम वापरून महाराजांचे विचार आणि स्वराज्याच्या तत्वज्ञानाचा प्रचार, प्रसार होणार आहे.
इतिहासाचे साक्षीदार बना!
शिवचरित्राचा जागतिक स्तरावर प्रचार आणि शिवस्वराज्याचा गजर करत साताऱ्यातून सुरू होणारी ही ऐतिहासिक रथयात्रा जपानमध्ये इतिहास घडवेल. सातारकरांनी बुधवार दि. १५ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी चार वाजता गांधी मैदान येथून प्रारंभ होणाऱ्या रथयात्रेस उपस्थित राहून ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले.

You must be logged in to post a comment.