पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांचे निर्देश; जिल्ह्यातील विकासकामांचा घेतला आढावा

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): १०वी आणि १२वीच्या परीक्षा संपल्यानंतर महाबळेश्वर-पाचगणी परिसरात तीन दिवसीय भव्य राज्यस्तरीय पर्यटन महोत्सव होणार आहे. या महोत्सवासाठी योग्य जागा निवडण्याचे निर्देश पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात पाटण विधानसभा मतदारसंघातील विकासकामांचा आढावा घेण्यासाठी देसाई यांनी आयोजित केलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
पर्यटनमंत्री देसाई यांनी निवडणुकीपूर्वी मंजूर केलेल्या तसेच प्रस्तावित विकासकामांचा आढावा घेतला. पाटण येथील प्रशासकीय इमारत, उपजिल्हा रुग्णालयाची इमारत, दौलतनगर येथील लोकेनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकातील नाट्यगृह व वसतिगृह, नागठाणे येथील राष्ट्रीय महामार्गावरील पूल, पुनर्वसनाच्या योजना, जलजीवन मिशनमधील प्रकल्प आणि पाणंद रस्त्यांच्या प्रगतीबाबत माहिती घेण्यात आली.

महाबळेश्वर परिसरात होणाऱ्या पर्यटन महोत्सवासाठी योग्य जागा निवडण्याचा आणि कार्यक्रमाची पूर्वतयारी करण्याचा आदेश पर्यटनमंत्री देसाई यांनी दिला. परीक्षेनंतर येणाऱ्या पर्यटकांमुळे परिसरात पर्यटनाला चालना मिळेल, असे त्यांनी सांगितले.
पाटण मतदारसंघातील १८५ पाणंद रस्त्यांच्या कामांपैकी अनेक कामे रखडली आहेत. शेतकऱ्यांच्या सहमतीअभावी अडचणी निर्माण होत असल्याने तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन प्रश्न मार्गी लावण्याचे निर्देश देण्यात आले. नागठाणे येथे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी उपाययोजना करण्याचेही आदेश देण्यात आले.
सातारा जिल्ह्यातील स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र आणि मॉडेल शाळा प्रकल्प राज्यासाठी आदर्शवत ठरल्याचे देसाई यांनी नमूद केले. या उपक्रमांसाठी जिल्हा नियोजन समितीने १५३ कोटी रुपये मंजूर केले असून, आगामी दोन महिन्यांत कामे पूर्ण करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
पावसाळ्यापूर्वी पुनर्वसन आणि सर्व विकासकामे पूर्ण करण्याचे आदेश देताना पर्यटनमंत्री देसाई म्हणाले, “जिल्हा नियोजन समितीने मंजूर केलेली कोणतीही कामे रखडणार नाहीत, याची दक्षता घ्यावी.
दरम्यान, महाबळेश्वर पर्यटन महोत्सवामुळे जिल्ह्याच्या पर्यटनाला नवा आयाम मिळणार असून, विकासकामांच्या प्रगतीमुळे परिसरात मोठ्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या बैठकीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल अहिरे, जलसंपदा विभागाचे अरुण नाईक, उपजिल्हाधिकारी महसूल विक्रांत चव्हाण, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

You must be logged in to post a comment.