साताऱ्यातील आदर्श शिक्षक दांपत्याचा राज्यस्तरीय गौरव!

कोल्हापूरच्या ‘आविष्कार फाउंडेशन’तर्फे विसापूरे दांपत्याला राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा): शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल साताऱ्यातील सेवानिवृत्त उपमुख्याध्यापक सुधीर विसापूरे आणि शिक्षिका प्रशाली विसापूरे यांना राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. सुधीर विसापूरे यांना ‘शिक्षण सेवा कार्यगौरव पुरस्कार’, तर सौ. प्रशाली विसापूरे यांना ‘राजमाता जिजाऊ पुरस्कार’ प्रदान केला जाणार आहे. कोल्हापूरच्या ‘आविष्कार सोशल अँड एज्युकेशनल फाउंडेशन’तर्फे दिल्या जाणाऱ्या या पुरस्कारांचे वितरण २३ मार्च रोजी सोलापूर येथे होणार आहे. संस्थेचे अध्यक्ष संजय पवार यांनी याबाबत माहिती दिली.

१९ वर्षांची गौरवशाली परंपरा असलेल्या आविष्कार फाउंडेशनतर्फे गुणवंत शिक्षकांचा सन्मान केला जातो. शिक्षण, समाजसेवा आणि सांस्कृतिक क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या शिक्षकांची दखल घेऊन त्यांना हा सन्मान दिला जातो.

साताऱ्यातील सुधीर विसापूरे यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या सातारा आणि पुणे येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक, उपशिक्षक आणि उपमुख्याध्यापक म्हणून जबाबदाऱ्या सांभाळल्या. आपल्या प्रदीर्घ सेवाकाळात त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला. त्यांनी नवीन प्रयोगशील अध्यापन पद्धतींचा अवलंब, संशोधनाधारित शिक्षणाचा प्रसार, तसेच विद्यार्थ्यांमधील मूल्यसंस्कार रुजविण्यावर विशेष भर दिला. त्यांच्या शिस्तप्रियतेमुळे आणि विद्यार्थ्यांवरील विशेष प्रेमामुळे ते आदर्श शिक्षक म्हणून ओळखले जातात.

दुसरीकडे, सौ. प्रशाली विसापूरे या सध्या सातारा तालुक्यातील जैतापूर जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना शिक्षणासाठी प्रवृत्त करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी त्यांनी ‘शिक्षण तुमच्या दारी’ हा उपक्रम राबवला, ज्यामुळे शाळाबाह्य मुली पुन्हा शैक्षणिक प्रवाहात आल्या. त्यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक योगदानाची दखल घेऊन त्यांना ‘राजमाता जिजाऊ पुरस्काराने’ सन्मानित करण्यात येणार आहे.

हा गौरव सोहळा २३ मार्च रोजी दुपारी १:३० वाजता डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह, सिद्धेश्वर मंदिराशेजारी, सोलापूर येथे होणार आहे. शिक्षण, समाजसेवा आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा मोठ्या दिमाखात पार पडणार आहे. या प्रेरणादायी क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन आविष्कार फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे.

पुरस्कार जाहीर झाल्यानंतर विसापूरे दांपत्याने हा पुरस्कार आपल्या विद्यार्थ्यांना, सहकाऱ्यांना आणि कुटुंबीयांना समर्पित करत, भविष्यातही शिक्षण क्षेत्रात नवे उपक्रम राबवण्याचा संकल्प व्यक्त केला. तसेच हा पुरस्कार पुढील कार्यासाठी मिळालेली प्रेरणा असल्याचे सांगितले.

error: Content is protected !!