साताऱ्यात महिला अधिकाऱ्यांसाठी विशेष कार्यशाळा; “दिशा विकास मंच”चा प्रशासन सशक्तीकरणाचा उपक्रम

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा): जनमाहिती अधिकार कायदा (RTI) हा लोकशाहीचा प्रभावी आधारस्तंभ असून, नागरिकांना पारदर्शक आणि उत्तरदायी प्रशासन मिळवून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतो. मात्र, माहिती अधिकार कायद्याच्या अंमलबजावणीसंदर्भात अनेक शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना संभ्रम असतो. अर्जदारांना माहिती देताना कायदेशीर तरतुदींची अचूक अंमलबजावणी करणे महत्त्वाचे असते. त्यासाठी जागरूकता आणि सुस्पष्ट मार्गदर्शनाची गरज ओळखून दिशा विकास मंचच्या वतीने “नको भीती, हवी कायद्याची माहिती” या टॅगलाइनसह विशेष प्रबोधन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती दिशा विकास मंचचे अध्यक्ष सुशांत मोरे यांनी दिली.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ही कार्यशाळा ८ मार्च रोजी सकाळी ११ ते १ या वेळेत साहित्य सदन, जिल्हा पत्रकार भवन, गोडोली, सातारा येथे होणार आहे. विशेषतः महिला शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून, यशदा, पुणे येथील जनमाहिती अधिकार कायद्याचे तज्ज्ञ प्रशिक्षक ओमकार पाटील मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेत माहिती अधिकार कायद्याची संपूर्ण प्रक्रिया, अर्जदारांना माहिती देताना अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घ्यायची खबरदारी आणि कायद्याच्या योग्य अंमलबजावणीसाठी महत्त्वाच्या बाबींवर सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे.
गेल्या १५ वर्षांपासून दिशा विकास मंच साताऱ्यात माहिती अधिकार कायद्याचा प्रभावी वापर करून अनेक प्रकरणे मार्गी लावण्याचे कार्य करीत आहे. माहिती अधिकार कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अधिकाऱ्यांना सक्षम बनविणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश आहे. माहितीच्या अधिकारामुळे प्रशासन अधिक पारदर्शक आणि लोकाभिमुख होते, मात्र अनेकदा अधिकारी आणि कर्मचारी या प्रक्रियेत अडचणीत येतात. त्यामुळे या कार्यशाळेच्या माध्यमातून RTI अर्जांचे उत्तर देण्याच्या प्रक्रियेसंदर्भात सखोल माहिती मिळणार आहे.
याशिवाय, या कार्यशाळेच्या निमित्ताने समाजरत्न पुरस्कार वितरण सोहळाही आयोजित करण्यात आला असून, सामाजिक कार्यात उल्लेखनीय योगदान दिलेल्या महिलांचा यावेळी सन्मान केला जाणार आहे.
कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी ९८५०४१११६३ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन दिशा विकास मंचचे अध्यक्ष सुशांत मोरे यांनी केले आहे.
“माहितीचा अधिकार हा लोकशाहीचा कणा आहे. भीती बाळगण्यापेक्षा हा कायदा समजून घेतला, तर तो अधिकाऱ्यांसाठीही फायदेशीर ठरेल. पारदर्शक प्रशासनासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी माहिती अधिकाराची भीती झटकून, त्याची योग्य अंमलबजावणी करावी. ही कार्यशाळा म्हणजे जबाबदारी आणि सक्षमीकरणाचा महत्वपूर्ण टप्पा आहे!”
- सुशांत मोरे, अध्यक्ष, दिशा विकास मंच.

You must be logged in to post a comment.