कासच्या पाण्याचे पारंपरिक ओटीभरण

सातारा शहराची तहान भागवणाऱ्या जलाशयाप्रती कृतज्ञता

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा शहराची तहान भागविणारा कास तलाव पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यावरून वाहू लागल्याने सातारकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. तलाव भरल्याचा आनंद रविवारी पारंपरिक पद्धतीने ‘ओटी भरून’ जलपूजन करत साजरा करण्यात आला. नगरपरिषदेचे नगराध्यक्ष, पदाधिकारी, नगरसेवक आणि नागरिकांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमातून वर्षभर शहराची तहान भागविणाऱ्या जलसाठ्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

कास तलावाची उंची वाढविण्याचे काम गेली अनेक वर्षे सुरू होते. हे काम पूर्ण झाल्यानंतर तलावाची साठवण क्षमता मोठ्या प्रमाणात वाढली असून, आता सुमारे अर्धा टीएमसी पाणीसाठा होत असल्याची माहिती उपनगराध्यक्ष तथा पाणीपुरवठा सभापती ॲड. दत्ता बनकर यांनी दिली. पूर्वीच्या तुलनेत सुमारे पाचपट अधिक पाणीसाठा होत असून, सलग पाच वर्षे पाऊस पडला नाही तरी शहराला पाणी पुरू शकेल, अशा स्वरूपाचे नियोजन असल्याचा दावा त्यांनी केला.

सध्या कास तलावातून सातारा शहराला सुमारे सात ते आठ एमएलडी पाणीपुरवठा होत आहे. नवीन जलवाहिनी कार्यान्वित झाल्यानंतर तो २१ एमएलडीपर्यंत नेण्याचे नियोजन असल्याचे बनकर यांनी सांगितले. त्यामुळे शहराच्या पूर्व भागासह हद्दवाढीतील भागांनाही कासचे पाणी उपलब्ध करून देण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्या माध्यमातून संपूर्ण शहराला चोवीस तास पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने नगराध्यक्ष आणि नगरसेवकांच्या माध्यमातून नियोजन सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

जलसाठ्याप्रती कृतज्ञतेची परंपरा

ज्येष्ठ नगरसेवक अविनाश कदम म्हणाले, यंदा एलनिनोमुळे पाऊस कमी पडण्याची भीती होती. त्यामुळे कास पूर्ण क्षमतेने भरेल की नाही, अशी चिंता होती. मात्र तलाव पूर्ण भरला आहे. वर्षभर आपले रक्षण करणारा तलाव भरल्यानंतर त्याची ओटी भरण्याची आपली परंपरा आहे. सातारकरांना मिळणाऱ्या शुद्ध आणि चांगल्या पाण्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे जलपूजन केले जाते.

या जलपूजनावेळी नगराध्यक्ष अमोल मोहिते, उपनगराध्यक्ष तथा पाणीपुरवठा सभापती ॲड. दत्ता बनकर, ज्येष्ठ नगरसेवक अविनाश कदम, आरोग्य सभापती धनंजय जांभळे, नियोजन सभापती अशोक शेडगे, महिला बाल कल्याण सभापती मोनिका घोरपडे, शिक्षण सभापती शंकर किर्दत, नगरसेविका आशा पंडित, हेमलता भोसले, शुभांगी काटवटे, विमल गोसावी, आशा डगळे, सीमा भोसले, नगरसेवक सुधाकर यादव, शंकर माळवदे, सचिन पाटोळे, रविराज किर्दत यांच्यासह सर्व पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका, पालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, कास पूर्ण क्षमतेने भरल्याने शहराच्या आगामी पाणीपुरवठ्याला मोठा आधार मिळाला आहे. मात्र वाढलेल्या जलसाठ्याबरोबरच त्याचे काटेकोर नियोजन आणि संवर्धनही तितकेच महत्त्वाचे आहे. कासचे पाणी ही सातारकरांची संजीवनी आहे. त्याचा जपून वापर करा आणि पाण्याचा अपव्यय टाळा, असे आवाहन ॲड. दत्ता बनकर यांनी शहरवासीयांना केले.

error: Content is protected !!