कोयना धरणाचे सहाही दरवाजे बंद

पावसाचा जोर ओसरताच सांडव्याचा विसर्ग थांबला

कोयनानगर, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर ओसरल्याने धरणातून सांडव्याद्वारे सुरू असलेला विसर्ग रविवारी (ता. ९) सायंकाळी सात वाजता पूर्णपणे थांबविण्यात आला. धरणाचे सहाही वक्र दरवाजे एक फुटावरून पूर्णपणे खाली घेण्यात आले आहेत. पायथा विद्युतगृहाचे एक युनिट सुरू असल्याने त्यातून १,०५० क्युसेक विसर्ग सुरू असून, आता कोयना नदीपात्रातील एकूण विसर्ग १,०५० क्युसेकवर आला आहे.

कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांत झालेल्या पावसामुळे धरणात पाण्याची आवक वाढली होती. धरणाची पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी सहा वक्र दरवाजांतून सांडव्याद्वारे पाणी सोडण्यात येत होते. मात्र, पावसाचा जोर आणि पाण्याची आवक कमी होत असल्याने विसर्ग टप्प्याटप्प्याने कमी करण्यात आला. अखेर रविवारी सायंकाळी सात वाजता सहाही दरवाजे पूर्णपणे खाली घेऊन सांडव्यावरील विसर्ग थांबविण्यात आला.

तत्पूर्वी सायंकाळी पाच वाजता धरणाची पाणीपातळी २१५४ फूट होती. धरणात ९३.०२ टीएमसी म्हणजेच ८८.३८ टक्के एकूण पाणीसाठा होता, तर उपयुक्त पाणीसाठा ८७.९० टीएमसी म्हणजे ८७.७९ टक्के होता. त्यावेळी धरणात १० हजार ७१९ क्युसेक पाण्याची आवक सुरू होती. सायंकाळी पाच वाजता पायथा विद्युतगृहातून १,०५० आणि वक्र दरवाजांतून ६ हजार ३७७ असा एकूण ७ हजार ४२७ क्युसेक विसर्ग सुरू होता. त्यानंतर सायंकाळी सात वाजता वक्र दरवाजे पूर्णपणे बंद करण्यात आल्याने सांडव्यावरील विसर्ग शून्यावर आला.

दरम्यान, रविवारी कोयना येथे एक मिलिमीटर, तर नवजा येथे सात मिलिमीटर पावसाची नोंद झाली. हंगामाच्या सुरुवातीपासून कोयना येथे ३ हजार ४६२, नवजा येथे ४ हजार २६६, तर महाबळेश्वर येथे ४ हजार २५२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

सांडव्यावरील विसर्ग सध्या थांबविण्यात आला असला, तरी पाणलोट क्षेत्रातील पाऊस आणि धरणात येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणावर पुढील निर्णय अवलंबून राहणार आहे. पावसाचे प्रमाण आणि आवक पुन्हा वाढल्यास सांडव्यावरून विसर्ग वाढविण्यात येऊ शकतो, असे कोयना सिंचन विभागाने स्पष्ट केले आहे.

त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, नदीपात्रात उतरू नये तसेच नदीकाठच्या गावांतील ग्राम प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन कोयना सिंचन विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी केले आहे.

error: Content is protected !!