क्रांतिकारकांची उपेक्षा क्रांतिदिनीच उघड

अभिवादन करण्यास आलेल्यांनीच काढले स्मारक परिसरातील गवत

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात क्रांतिकारकांचा जिल्हा म्हणून साताऱ्याचा गौरवाने उल्लेख केला जातो; मात्र क्रांतिदिनीच शहरातील ऐतिहासिक ‘चले जाव’ स्मारकाच्या दुरवस्थेचे विदारक चित्र समोर आले. स्मारकाचे प्रवेशद्वार बंद, तर परिसरात मोठ्या प्रमाणात गवत वाढलेले होते. अभिवादनासाठी आलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी अखेर स्वतः गवत काढून परिसराची स्वच्छता केली आणि त्यानंतर क्रांतिकारकांच्या स्मृतींना अभिवादन केले. या प्रकारावरून सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनासह लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली.

क्रांतिदिनानिमित्त जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते रविवारी या स्मारकाला अभिवादन करण्यासाठी आले होते. मात्र स्मारक परिसराची स्वच्छता आणि देखभाल झालेली नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. क्रांतिदिनाचे महत्त्व सांगितले जात असताना ऐतिहासिक स्मारकाची अशी अवस्था का, असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला.

‘प्रशासनाला क्रांतीच्या स्मृतींचाच विसर’

सामाजिक कार्यकर्ते महारुद्र तिकुंडे यांनी प्रशासनावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. क्रांतिकारकांचा जिल्हा म्हणून साताऱ्याचा उल्लेख केला जातो; मात्र क्रांतीच्या स्मृती जपणाऱ्या या ठिकाणाची दुरवस्था पाहता प्रशासनाला या इतिहासाचाच विसर पडल्याचे दिसते. स्मारकाची साधी स्वच्छता करण्यात आलेली नाही आणि प्रशासनाचा एकही प्रतिनिधी येथे उपस्थित नसणे ही गंभीर बाब आहे, अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला.

क्रांतिसिंह नाना पाटील यांनी उभारलेल्या प्रतिसरकाराच्या चळवळीचा वारसा साताऱ्याला आहे. त्या इतिहासाशी संबंधित स्मृतीस्थळांबाबत जिल्हा प्रशासन बेदरकार असल्याचा आरोप करत, या स्मारकांची योग्य देखभाल न झाल्यास सामाजिक कार्यकर्त्यांना प्रशासनाविरोधात आवाज उठवावा लागेल, असा इशाराही तिकुंडे यांनी दिला.

सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनीही लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. क्रांतिदिनाच्या भाषणांमध्ये क्रांतिकारकांची नावे गौरवाने घेतली जातात; मात्र त्यांच्या स्मृती जपणाऱ्या स्मारकांच्या मूलभूत देखभालीकडे दुर्लक्ष केले जाते. क्रांतिकारकांची नावे केवळ राजकीय फायद्यासाठी घ्यायची आणि प्रत्यक्षात त्यांच्या स्मारकांकडे दुर्लक्ष करायचे, हे योग्य नाही, अशी टीका त्यांनी केली.

क्रांतिदिन किंवा स्वातंत्र्यदिन आला की क्रांतिकारकांच्या त्यागाचे स्मरण करायचे आणि उर्वरित वर्षभर त्यांच्या स्मारकांकडे दुर्लक्ष करायचे, अशी परिस्थिती राहू नये. ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला, त्यांच्या स्मारकाची स्वच्छताही क्रांतिदिनी सामाजिक कार्यकर्त्यांना स्वतः करावी लागत असेल, तर प्रशासनाच्या उदासीनतेचे यापेक्षा बोलके चित्र दुसरे कोणते?

यावेळी सामाजिक कार्यकर्ते महारुद्र तिकुंडे, सुशांत मोरे, भरत राऊळ, शिवाजी जाधव, गणेश अहिवळे, गुलाब बनसोडे, विजय जाधव, कैलास कुंभार, जयवंत कांबळे, प्रज्योत तिकुंडे, सागर जगदाळे, मोहन शिंदे, हणमंत शिंदे आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!