दीड कोटीचे दागिने लुटणारी टोळी जेरबंद

सातारा पोलिसांकडून १२ तासांत छडा; आठ जणांना अटक

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : कवठे (ता. वाई) येथे पुणे–बंगळूर महामार्गावर कुरिअरची पिकअप अडवून, चालकाला कोयत्याचा धाक दाखवत ऐवज लुटल्याच्या गुन्ह्याचा सातारा पोलिसांनी बारा तासांत छडा लावला. संयुक्त कारवाईत आठ संशयितांना अटक करून त्यांच्याकडून १ कोटी ५५ लाख २७ हजार २५८ रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि चांदीच्या विटा हस्तगत करण्यात आल्या.

गोपीनाथ तानाजी कदम, मंगेश एकनाथ जाधव, ऋतिक रमेश कदम, आदित्य हणमंत कदम, सोमनाथ प्रमोद गोडसे, निखील दिलीप कदम, अक्षय शांताराम मोझर (सर्व रा. मालगाव, ता. जि. सातारा) आणि निषीध शरद साबळे (रा. शिवथर, ता. जि. सातारा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. १६) सकाळी सातच्या सुमारास मार्क एक्सप्रेस कुरिअर कंपनीची पिकअप पुण्याहून कोल्हापूरकडे जात होती. तीन दुचाकींवरून खेड शिवापूर व कापूरहोळ येथून पाठलाग करत संशयितांनी कवठेजवळ पिकअप अडविली. चालकाला कोयत्याचा धाक दाखवून मारहाण केली आणि मागील दरवाजा उघडून ऐवज नेला. याप्रकरणी भुईंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

स्थानिक गुन्हे शाखा, भुईंज, वाठार तसेच सातारा शहर व कराड शहर गुन्हे प्रकटीकरण पथकांनी तातडीने तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाद्वारे शोध सुरू असताना निरीक्षक विश्वजीत घोडके यांना बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयितांना ताब्यात घेण्यात आले. कराड येथील एका कुरिअर कंपनीत काम करणाऱ्या गोपीनाथ कदमला पिकअपच्या वेळापत्रकाची माहिती होती. त्याने दिलेल्या माहितीवरून दरोड्याचा कट आखण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

ही कारवाई पोलिस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, उपविभागीय पोलिस अधिकारी विपुल पाटील व सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक पुनम झगडे, पोलिस निरीक्षक विश्वजीत घोडके, सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, सुशील भोसले, राजेश माळी, अभिजीत यादव, रोहित फार्णे, पोलिस उपनिरीक्षक परितोष दातीर, चंद्रकांत पुजारी, सुरज शिंदे आणि आकाश मोरे यांनी कारवाईत सहभाग घेतला.

स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिस अंमलदार अतिष घाडगे, राजू मुलाणी, विजय कांबळे, संजय शिर्के, संतोष सपकाळ, शरद बेबले, लक्ष्मण जगधने, लैलेश फडतरे, सचिन साळुंखे, प्रवीण फडतरे, हणमंत भोसले, नवनाथ कदम, राकेश खांडके, हसन तडवी, सनी आवटे, अजय जाधव, सुजित भोसले, अरुण पाटील, अविनाश चव्हाण, अमित माने, स्वप्नील कुंभार, ओंकार यादव, स्वप्नील शिंदे, किरण जगताप, मोहन पवार, विशाल पवार, रोहित निकम, पृथ्वीराज जाधव, महेश निर्मळ, स्वप्नील लोखंडे, इरफान मुलाणी, संकेत निकम, संजय जाधव, अमृत कर्पे, विजय निकम, आनंदा भोये, महेश जाधव, शकुंतला सणस, आदिका वीर तसेच भुईंज पोलिस ठाण्यातील नितीन जाधव, सोमनाथ बल्लाळ आणि सागर मोहिते यांनी कारवाई केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपास पथकांचे अभिनंदन केले.

error: Content is protected !!