गणेशोत्सवातील हलत्या देखाव्यांमागील ‘कल्पक हात’ काळाच्या पडद्याआड

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : साताऱ्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवातील हलत्या देखाव्यांना तांत्रिक कल्पकतेची जोड देणारे, श्रीमंत व्यापारी गणेशोत्सव मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते व मार्गदर्शक सुरेंद्र ऊर्फ नाना रंगराव शालगर (वय ७७) यांचे आज शुक्रवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच व्यापारी गणेशोत्सव मंडळासह सामाजिक, राजकीय, धार्मिक व व्यापारी क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात आली.
कल्पक तंत्रज्ञ, सामाजिक-धार्मिक कार्यातील सक्रिय कार्यकर्ता आणि सर्वांना आपलेसे करणारा दिलदार माणूस अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने व्यापारी गणेशोत्सव मंडळाचा एक आधारस्तंभ हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. खासदार श्रीमंत छ. उदयनराजे, राजमाता श्रीमंत छ.कल्पनाराजे, सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोंसले यांसह शहरातील मान्यवरांनी राहते घरी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. शुक्रवारी सायंकाळी संगम माहुली येथे शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
नाना शालगर यांचे नाव साताऱ्यातील श्रीमंत व्यापारी गणेशोत्सव मंडळाच्या जुन्या वैभवाशी घट्ट जोडले गेले होते. एकेकाळी मंडळाचे हलते आणि यांत्रिक देखावे पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असे. या देखाव्यांमागील यंत्रणा, तांत्रिक रचना आणि नवनवीन कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यात नानांचा मोठा वाटा होता. उपलब्ध साधनसामग्रीतून कल्पक प्रयोग उभे करण्याचे त्यांचे कौशल्य अनेकांना अचंबित करणारे होते.
विश्व हिंदू परिषदेचे ज्येष्ठ कार्यकर्ते म्हणूनही ते परिचित होते. १९९० च्या दशकातील श्रीराम मंदिर आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता. श्रीराम रथयात्रेसाठी त्यांनी कल्पकतेने तयार केलेला रथ त्या काळात विशेष आकर्षण ठरला होता. धार्मिक आणि सामाजिक कार्यात सहभागी होताना तांत्रिक कौशल्याचा उपयोग करण्याची त्यांची हातोटी वेगळी होती.
त्यांच्या कल्पकतेचा आणखी एक उल्लेखनीय नमुना म्हणजे त्यांनी स्वतः तयार केलेली छोटी चारचाकी. मारुती ८०० सारख्या छोट्या मोटारी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्याच्या आधीच नानांनी डिझेल इंजिनवर चालणारी छोटी चारचाकी तयार केली होती. या गाडीला प्रतिलिटर सुमारे ३५ किलोमीटर मायलेज मिळत असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले. या वाहनाला आरटीओची परवानगीही मिळाली होती. मात्र, पुढे व्यावसायिक उत्पादनाच्या दिशेने त्याचे रूपांतर होऊ शकले नाही. तरीही त्या काळात स्वतःच्या कल्पनेतून वाहन उभे करण्याचा त्यांचा प्रयोग त्यांच्या तांत्रिक प्रतिभेची साक्ष देणारा ठरला.

साताऱ्यातील प्रसिद्ध हार्डवेअर व्यावसायिक म्हणूनही नाना शालगर यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. मात्र, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खरी श्रीमंती व्यवसायापेक्षाही त्यांनी आयुष्यभर जोडलेल्या माणसांमध्ये होती. मनमिळाऊ स्वभाव, दिलदार वृत्ती आणि समोरच्या व्यक्तीला सहज आपलेसे करण्याची हातोटी यामुळे त्यांचा मित्रपरिवार मोठा होता. वय, पद अथवा क्षेत्राचा विचार न करता माणसे जोडत राहणे हा त्यांच्या स्वभावाचा भाग होता. तांत्रिक ज्ञानाबरोबरच मिश्किल स्वभाव ही नानांची खासीयत. विनोद सांगण्याची खुमासदार शैली आणि नकला करण्याच्या कौशल्यामुळे ते कोणत्याही मैफलीत हास्याचे रंग भरत असत. सर्वांना हसवणारे नाना जाताना मात्र शेकडो लोकांना अश्रूंनी भिजवून गेले.
तंत्रज्ञानाची आवड जितकी प्रखर, तितकाच त्यांचा स्वभाव मोकळा आणि माणसे जोडणारा होता. दिलदार, खुल्या मनाचा आणि ‘जगन्मित्र’ म्हणून त्यांचा मोठा मित्रपरिवार होता. व्यापारी गणेशोत्सव मंडळाला नावारूपाला आणण्यात त्यांनी दिलेले योगदान आणि पडद्यामागे राहून केलेले काम जुन्या कार्यकर्त्यांच्या स्मरणात कायम राहणार आहे.
You must be logged in to post a comment.