शिवेंद्रसिंहराजे फोन उचलत नाहीत : जरांगे

राजगादीचा सन्मान करत प्रथमच खंत व्यक्त

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सातारा गॅझेटच्या मुद्द्यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याबाबत प्रथमच जाहीरपणे खंत व्यक्त केली आहे. सातारा गॅझेट लागू करण्याबाबत शिवेंद्रसिंहराजेंचा शब्द प्रमाण मानला होता. त्यानंतर याच विषयावर दोनदा त्यांच्याशी बोललो; मात्र गेल्या दीड-दोन महिन्यांपासून ते फोनही उचलत नसल्याचा दावा जरांगे यांनी केला.

काल गुरुवारी एका यूट्यूब चॅनेलने जरांगे यांची मुलाखत प्रसारित केली. त्यात बोलताना त्यांनी हा दावा केला. ‘राजगादीचा सन्मान करायचा म्हणून आजवर याबाबत बोललो नाही,’ असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानावर झालेल्या आंदोलनावेळी हैदराबाद गॅझेटबरोबरच सातारा गॅझेटच्या अंमलबजावणीचा मुद्दाही पुढे आला होता. त्या वेळी सातारा गॅझेटबाबत शिवेंद्रसिंहराजेंनी दिलेला शब्द जरांगे यांनी प्रमाण मानला होता. मात्र, अद्याप सातारा गॅझेट लागू झालेले नसताना जरांगे यांनी एकदाही शिवेंद्रसिंहराजेंचे नाव का घेतले नाही, असा प्रश्न त्यांना मुलाखतीत विचारण्यात आला. गॅझेट लागू झाले नसल्याने दिलेल्या शब्दाची नैतिक जबाबदारी शिवेंद्रसिंहराजेंचीही ठरत नाही का, अशीही विचारणा करण्यात आली.

त्यावर जरांगे म्हणाले, ‘मी सत्य तेच सांगतो. मी कधीच कोणाचा राजीनामा मागितला नाही. दिल्लीत गेलो तेव्हाही कुणाला राजीनामा द्या, असे म्हटले नाही. माझे कर्तव्य समाजाच्या लेकरांच्या पाठीशी उभे राहण्याचे होते आणि तेच मी केले.’

शिवेंद्रसिंहराजेंबाबत माध्यमांनी आपल्याला यापूर्वी प्रश्न विचारला नव्हता, असे सांगून जरांगे म्हणाले, ‘शिवेंद्रसिंहराजें यांना दोनदा याबाबत सांगितले. त्यानंतर ते फोनच उचलत नाहीत. दीड-दोन महिने झाले, ते फोन उचलत नाहीत,’ असा दावा त्यांनी केला.

मात्र, यावरून शिवेंद्रसिंहराजेंवर थेट टीका करण्याचे जरांगे यांनी टाळले. त्यामागचे कारण सांगताना त्यांनी राजगादीबद्दल आदराची भूमिका मांडली. ‘शेवटी राजगादी ही राजगादी आहे. राजगादीचा सन्मान करावा लागतो. तिचा अवमान करायचा नाही. त्यामुळे बोलायचे नाही,’ असे ते म्हणाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अहिल्याबाई होळकर यांच्या वारसांबाबत किंवा छत्रपतींच्या वारसांबाबत आपण कधीही अवमानकारक बोललो नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सातारा गॅझेटच्या प्रश्नासाठी आता कोणाच्या आधाराची वाट पाहण्यापेक्षा समाजाने स्वतःच्या ताकदीवर लढले पाहिजे, अशी भूमिकाही जरांगे यांनी मांडली. ‘आमच्यात लढण्याची ताकद आहे, क्षमता आहे. एखाद्या विषयात यश मिळवायचे असेल तर आपल्यात ताकद असावी लागते. कोणाच्या आधारावर समाजाला किंवा समाजाच्या लेकरांना मोठे करता येत नाही,’ असे ते म्हणाले. याच उत्तराच्या ओघात जरांगे यांनी, ‘कोणीतरी धोका देऊन गेला म्हणून त्याच्यावर रडत बसण्यापेक्षा आपण पुढचे काम करत राहिले पाहिजे,’ असे सूचक विधानही केले.

दरम्यान, जरांगे यांच्या ताज्या मुलाखतीमुळे सातारा गॅझेटचा मुद्दा पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आलेला असताना, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची बाजू जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, ते विदर्भ दौऱ्यावर असल्याने त्यांच्याशी संभाषण होऊ शकले नाही.

शनिवारपासून पुन्हा आमरण उपोषण

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी जरांगे शनिवारपासून अंतरवाली सराटी येथे पुन्हा आमरण उपोषण सुरू करणार आहेत. आंदोलनासाठी अंतरवाली सराटीत तयारी करण्यात आली असून, मोठा मंडप उभारण्यात आला आहे. सरकारच्या शिष्टमंडळानेही अलीकडे अंतरवाली सराटीत जाऊन जरांगे यांच्याशी चर्चा केली होती. मात्र, त्यानंतरही त्यांनी आंदोलनावर ठाम राहण्याची भूमिका घेतली आहे.

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर सरकारने ठोस निर्णय घ्यावा, अशी जरांगे यांची भूमिका आहे. मागण्यांबाबत अपेक्षित निर्णय न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत. अंतरवाली सराटीतून हा लढा पुन्हा सुरू होत असल्याने या आंदोलनाकडे राज्य सरकारसह मराठा समाजाचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!