धाकदपटशाहीला जशास तसे उत्तर देऊ!

जावळीतील संघर्षावरून शिवेंद्रसिंहराजे आक्रमक

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीपूर्वीच विकास सेवा सोसायट्यांच्या ठरावांवरून जावळीत राजकीय संघर्ष पेटला आहे. आखाडे, हातगेघर परिसरातील घडामोडी आणि त्यानंतरच्या मारहाणीच्या घटनेवरून सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विरोधकांना थेट इशारा दिला. ‘धाकदपटशाहीला जशास तसे उत्तर देण्याची ताकद आमच्यातही आहे. कार्यकर्त्यांवर अन्याय झाला तर त्यांच्या पाठीशी उभे राहू. वेळ आली आणि संघर्ष करावा लागला, तर आम्ही ११० टक्के तयार आहोत,’ असे त्यांनी ठणकावले.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना शिवेंद्रसिंहराजे यांनी जावळीतील राजकीय घडामोडींसह प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन, कास परिसराचा पर्यटन विकास, पालकमंत्रिपदाची चर्चा आणि जिल्हा बँकेच्या आगामी निवडणुकीवर भाष्य केले.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी विकास सेवा सोसायट्यांच्या प्रतिनिधींच्या ठरावांची प्रक्रिया पूर्ण झाली असली, तरी त्यातून निर्माण झालेली राजकीय धग अद्याप कायम आहे. विशेषतः जावळी तालुक्यात काही सोसायट्यांच्या ठरावांवरून दोन्ही गट आमनेसामने आले. याबाबत शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘त्या-त्या गावातील सोसायटीने आपल्या विचाराने ठराव करावा, हीच माझी सुरुवातीपासून भूमिका होती. ठरावांची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर मी स्वतः कुठल्याही ठिकाणी गेलो नव्हतो.

मात्र, आपल्या विचाराच्या तीन सोसायट्यांमध्ये शशिकांत शिंदे यांच्या समर्थकांनी आपली माणसे फोडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला. ‘शशिकांत शिंदे साहेबांच्या लोकांनी आमची माणसे पळविण्याचा प्रयत्न केला. आम्ही तो प्रयत्न हाणून पाडला आणि त्या ठिकाणी आमच्या विचाराचे ठराव झाले, असा दावा त्यांनी केला.

म्हणून मला आखाडेत जावे लागले

आखाडे विकास सेवा सोसायटीच्या ठरावावेळी वातावरण तंग करण्याचा प्रयत्न झाल्याचे सांगत शिवेंद्रसिंहराजेंनी आपण स्वतः तेथे का गेलो, याचेही स्पष्टीकरण दिले. आपल्या कार्यकर्त्यांवर दबाव आणला जात असेल तर लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्या पाठीशी उभे राहणे ही आपली जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.‘माझ्या कार्यकर्त्यांना किंवा माझ्याबरोबर काम करणाऱ्यांना दहशत, दमदाटी करायची आणि शेजारचे गाव मोठे आहे म्हणून तेथून दादागिरी करायची असेल, तर शेवटी माझ्या कार्यकर्त्यांसाठी मला रस्त्यावर उतरावे लागेल. ती भूमिका मला घ्यावीच लागेल. म्हणून मी तिथे गेलो,’ असे ते म्हणाले.

आखाडे सोसायटीमध्ये आपल्या बाजूला बहुमत होते आणि त्यानुसार आपल्या विचाराचा ठराव झाल्यानंतर हा वाद तेथेच संपायला हवा होता, अशी भूमिका त्यांनी मांडली. ‘लोकशाहीत ज्याच्याकडे बहुमत आहे त्याचा ठराव होतो. आमच्या विचाराचा ठराव झाला आणि विषय तिथेच संपला होता,’ असे त्यांनी सांगितले.

मारहाण झाली; मग दहशत कोणाची?

मात्र, ठरावानंतर संबंधित कुटुंबातील तरुणाला झालेल्या मारहाणीने या संघर्षाला वेगळे वळण मिळाले. विरोधकांकडून होणाऱ्या दहशतीच्या आरोपांवर याच घटनेचा दाखला देत शिवेंद्रसिंहराजेंनी पलटवार केला.‘ज्या मुलाच्या आईचा ठराव झाला, त्याच मुलाला त्यानंतर मारहाण झाली. मग दहशत कोण करतंय, दडपशाही कोण करतंय आणि दमदाटी कोण करतंय, हे आता कळले आहे. पोलीस त्यावर पुढील कारवाई करत आहेत,’ असे त्यांनी सांगितले.

लोकशाहीची भाषा बोलणे आणि प्रत्यक्षात धाकदपटशाही करणे या वेगवेगळ्या गोष्टी असल्याचे सांगत त्यांनी विरोधकांना थेट इशारा दिला. ‘अशा पद्धतीने धाकदपटशाही करणार असाल, तर जशास तसे उत्तर देण्याची आमचीही तयारी आहे. तशी ताकद आमच्यातसुद्धा आहे, हे समोरच्यांनी लक्षात ठेवावे,’ असे ते म्हणाले.

मलाही काही आयते मिळालेले नाही

कार्यकर्त्यांच्या प्रश्नावर कोणतीही तडजोड करणार नसल्याचे स्पष्ट करताना शिवेंद्रसिंहराजेंनी स्वतःच्या राजकीय वाटचालीचाही उल्लेख केला.‘संघर्ष कोणाला नवीन नाही. सगळी नेतृत्वे संघर्षातूनच उभी राहिली आहेत. मलाही काही आयते मिळालेले नाही. मीदेखील संघर्षातूनच इथपर्यंत आलो आहे. त्यामुळे वेळ आली आणि संघर्ष करावा लागला, तर आम्ही ११० टक्के तयार आहोत,’ असे त्यांनी ठणकावले.

वंचित प्रकल्पग्रस्तांसाठी ‘विशेष बाब’ म्हणून प्रस्ताव

दरम्यान, जावळी तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या प्रलंबित प्रश्नावरही बैठकीत चर्चा झाली. पुनर्वसनाच्या प्रक्रियेत काही कुटुंबे लाभापासून वंचित राहत असल्याचा मुद्दा ग्रामस्थांकडून पुढे आला होता. या कुटुंबांनाही न्याय मिळावा यासाठी ‘विशेष बाब’ म्हणून स्वतंत्र प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठविण्याचा मार्ग स्वीकारण्यात आल्याचे शिवेंद्रसिंहराजे यांनी सांगितले.

याबाबत ग्रामस्थांशीही चर्चा झाली असून सर्वांना समान पद्धतीने लाभ मिळणार असेल तर या प्रस्तावानुसार पुढे जाण्यास ग्रामस्थांनी मान्यता दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यानुसार आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.

कास परिसरासाठी पर्यटनाचा नवा आराखडा

कास आणि परिसरातील पर्यटन विकासावरही बैठकीत सविस्तर चर्चा झाली. कास पठार पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येतात; मात्र त्यांनी केवळ कास पाहून परतण्याऐवजी परिसरात एक-दोन दिवस मुक्काम करून इतर निसर्गस्थळांनाही भेट द्यावी, या दृष्टीने पर्यटनाचे नवे नियोजन करण्यात येत असल्याचे शिवेंद्रसिंहराजेंनी सांगितले.

कुसुंबी परिसरातील पर्यटन विकासासाठी वन विभागाच्या माध्यमातून सुमारे तीन कोटी रुपयांची कामे मंजूर झाली आहेत. या निधीतून कोणती कामे करण्यात येणार आहेत, याचे नियोजनही करण्यात आले आहे. कास परिसरातील मोठ्या आणि छोट्या धबधब्यांच्या ठिकाणी पर्यटकांसाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्याबाबतही वन विभागाकडून नियोजन सुरू आहे.

वजराई धबधब्याच्या ठिकाणी पर्यटकांना निसर्गसौंदर्य सुरक्षितपणे अनुभवता यावे यासाठी आकर्षक ‘व्ह्यू गॅलरी’ उभारण्याचा प्रस्ताव करण्यात आला आहे. कास, कुसुंबी, वजराई-भांबवलीसह परिसरातील विविध पर्यटनस्थळे एकमेकांना जोडून पर्यटकांसाठी नवे ‘पॉईंट’ विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे.

‘कास परिसरात आलेल्या पर्यटकाला एक-दोन दिवस येथे फिरायचे असेल, तर त्याला पाहण्यासाठी वेगवेगळी ठिकाणे उपलब्ध झाली पाहिजेत. त्या दृष्टीने हे सगळे नियोजन सुरू आहे,’ असे शिवेंद्रसिंहराजे म्हणाले.

मी आणि जयकुमार गोरे एकत्रच

पालकमंत्री जयकुमार गोरे आणि शिवेंद्रसिंहराजे यांच्यातील राजकीय संबंध तसेच पालकमंत्री बदलाच्या चर्चेवरही त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली. पालकमंत्रिपदाचा विषय सध्या नसल्याचे सांगत त्यांनी आपल्यात आणि गोरे यांच्यात दुरावा असल्याच्या चर्चांनाही फेटाळले.

‘मी आणि जयकुमार गोरे एकत्रच आहोत. आम्ही दोघेही भाजपमध्ये आहोत, आमदार आहोत. आमचा एकमेकांवर पहिल्यापासून विश्वास आहे. मुख्यमंत्र्यांनी आमच्यावर मोठी जबाबदारी दिली आहे आणि आम्ही दोघेही भाजपचे काम करत आहोत,’ असे त्यांनी सांगितले. पालकमंत्रिपदाबाबत वरिष्ठ पातळीवर यापूर्वीच निर्णय झालेला असल्याने आता बदलाचा कोणताही विषय नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हा बँकेचे पत्ते योग्य वेळीच!

जिल्हा बँकेच्या आगामी निवडणुकीत कोणती राजकीय समीकरणे आकार घेणार, याबाबत मात्र शिवेंद्रसिंहराजेंनी सावध पवित्रा घेतला. ठरावांची प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी निवडणुकीची अजून बरीच प्रक्रिया बाकी असल्याचे त्यांनी सांगितले.कच्ची मतदारयादी, अंतिम मतदारयादी आणि त्यानंतर पुढील निवडणूक प्रक्रिया होणार आहे. आपल्या माहितीनुसार जिल्हा बँकेची निवडणूक प्रक्रिया ऑक्टोबरच्या आसपास सुरू होण्याची शक्यता असल्याने एवढ्या आधी कोणताही अंतिम राजकीय निर्णय घेण्याचा प्रश्न नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

‘जिल्हा बँकेची अजून बरीच प्रक्रिया व्हायची आहे. ती पूर्ण झाल्यानंतर पुढचे निर्णय होतील. वेळ येईल तेव्हा जे निर्णय घ्यायचे आहेत, ते घेतले जातील,’ असे सांगत शिवेंद्रसिंहराजेंनी जिल्हा बँकेतील आगामी राजकीय समीकरणांबाबत आपले पत्ते उघडणे टाळले.

error: Content is protected !!