महाराष्ट्रातील गडकोटांवर भगवा झेंडा फडकवण्यासाठी मागणी

भाजपच्या विकास गोसावी यांचे लेखी निवेदन मंत्र्यांकडे सादर

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): महाराष्ट्रातील ऐतिहासिक गडकोट आणि स्मारकांवर कायमस्वरूपी भगवा झेंडा फडकवावा, अशी ठाम मागणी भारतीय जनता पार्टीचे सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी यांनी केली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांना लेखी निवेदनाद्वारे त्यांनी ही मागणी सादर केली.

इतिहासाचा गौरव आणि भगव्याचा सन्मान

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचा प्रतीक असलेला भगवा झेंडा महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाचे प्रतीक आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी या झेंड्याला अटकेपार नेले, तर मावळ्यांनी त्याचा सन्मान राखत स्वराज्याची मर्यादा वाढवली. परंतु आज गडकोटांवर आणि ऐतिहासिक स्थळांवर भगवा झेंडा दिसत नसल्याची खंत व्यक्त करत गोसावी यांनी याबाबत तातडीने पावले उचलण्याचे आवाहन केले.

जंजिऱ्यावरील प्रकारामुळे निर्माण झाला रोष

गोसावी यांनी जंजिरा किल्ल्यावर भगवा झेंडा नेण्यास मनाई केल्याच्या प्रकाराकडेही लक्ष वेधले. काही दिवसांपूर्वी व्हिडिओच्या माध्यमातून हा प्रकार समोर आला होता. महाराष्ट्रातील गडकोटांवर भगवा झेंडा फडकवण्यासाठी मनाई करणे हे ऐतिहासिक वारशाचा अपमान असल्याचे गोसावी यांनी नमूद केले.

मागणीस पाठिंबा वाढत चालला

गोसावी यांच्या या मागणीला सातारकरांसह महाराष्ट्रातील विविध सामाजिक संघटनांनीही पाठिंबा दर्शवला आहे. ऐतिहासिक गडकोट आणि स्मारकांवरील भगवा झेंडा हा स्वाभिमान आणि संस्कृतीचा वारसा असून, तो कायमस्वरूपी फडकत राहणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.

छत्रपतींचा सन्मान राखण्यासाठी ठोस पावले आवश्यक

भाजपने गडकोटांवरील भगवा झेंडा फडकवण्यासाठी कायदेशीर पाठपुरावा करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. “महाराष्ट्राचा इतिहास फक्त पुस्तके वाचण्यासाठी नव्हे, तर तो जिवंत ठेवण्यासाठी आहे,” असे गोसावी यांनी म्हटले.

या निवेदनावर त्वरित कार्यवाही होऊन भगव्या झेंड्याचा सन्मान पुनर्स्थापित होण्याची अपेक्षा सर्वसामान्य जनतेने व्यक्त केली आहे.

या निवेदनाच्या वेळी भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशीलदादा कदम, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवनामे, सातारा शहर सरचिटणीस प्रवीण शहाणे, विक्रांत भोसले, नितीन कदम, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष विक्रम बोराटे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!