सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ६ जानेवारी हा ‘पत्रकार दिन’ म्हणून साजरा केला जातो. यंदाचा पत्रकार दिन साताऱ्यातील जिल्हा पत्रकार भवनाच्या इमारतीत प्रथमच होत असून हा ऐतिहासिक कार्यक्रम सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे.
गोडोली येथील जिल्हा पत्रकार भवनात सोमवारी दि.६ जानेवारीला सकाळी ११.३० वाजता हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष हरिष पाटणे भूषविणार आहेत. यावेळी सातारा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष विनोद कुलकर्णी, प्रभारी उपसंचालक तथा जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे, सातारा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट तसेच सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विठ्ठल हेंद्रे यांची उपस्थिती राहणार आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन सातारा पत्रकार संघ, सातारा जिल्हा पत्रकार संघ, डिजिटल मीडिया परिषद, जिल्हा माहिती कार्यालय, आणि सातारा इलेक्ट्रॉनिक मीडिया यांच्या संयुक्त विद्यमाने केले आहे, अशी माहिती सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विठ्ठल हेंद्रे आणि कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर भोईटे यांनी दिली.
कार्यक्रमात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करण्यात येईल. मान्यवरांचा सत्कार होऊन, त्यांचे मनोगत सादर केले जाणार आहे. जिल्ह्यातील पत्रकार आणि छायाचित्रकार यांना एकत्र येण्यासाठी आणि पत्रकारितेतील योगदानाचा गौरव करण्यासाठी हा कार्यक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
सर्व पत्रकारांना आवाहन
पत्रकार दिनाच्या कार्यक्रमाला जिल्ह्यातील सर्व पत्रकार, छायाचित्रकार आणि माध्यम क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सातारा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष उमेश भांबरे, सचिव गजानन चेणगे, संघटक अजित जगताप, खजिनदार अमित वाघमारे, आणि कार्यकारिणी सदस्यांनी केले आहे.
एकत्रित प्रयत्नांनी वाढणार पत्रकारितेचे महत्त्व
पत्रकारिता ही लोकशाहीचा चौथा स्तंभ असून, सामाजिक बदलांमध्ये तिची भूमिका मोलाची आहे. पत्रकार दिनाचा उत्सव हा पत्रकारांना एकत्र आणण्यासाठी, त्यांच्या कामाचा सन्मान करण्यासाठी आणि एकमेकांशी संवाद साधण्यासाठी महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरणार आहे.
जिल्हा पत्रकार भवनासाठी ऐतिहासिक दिवस
सातारा जिल्हा पत्रकार भवनात पहिल्यांदाच होणारा हा पत्रकार दिन ऐतिहासिक ठरणार असून त्यातून पत्रकारितेच्या सामाजिक योगदानाला नवी दिशा मिळेल, तसेच भविष्यातील अनेक उपक्रमांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

You must be logged in to post a comment.