पोलिसांसाठी खास वाढदिवसाची भेट; कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी विशेष रजा

साताऱ्यात पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांचा अभिनव उपक्रम

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): सातारा शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी पोलीस कर्मचार्‍यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या क्षणांना आनंददायी बनवण्यासाठी एक आगळावेगळा निर्णय घेतला आहे. कामाच्या सततच्या ताणाखाली असलेल्या पोलीस कर्मचार्‍यांना त्यांच्या वाढदिवशी कुटुंबासोबत वेळ देता यावा, यासाठी त्यांनी विशेष रजेचा उपक्रम सुरू केला आहे. १ जानेवारी २०२५ पासून सुरू झालेल्या या उपक्रमाने साताऱ्यातील पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण केले आहे.

वाढदिवसाला मिळणार सुट्टी,कुटुंबासोबत खास वेळ

पोलिस दलातील कर्मचारी त्यांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे वैयक्तिक क्षण साजरे करू शकत नाहीत. त्यामुळे पोलीस निरीक्षक मस्के यांनी ज्या कर्मचार्‍याचा वाढदिवस असेल त्याला एक दिवस आधी ठाण्यात केक कापून शुभेच्छा देण्याची आणि वाढदिवसाच्या दिवशी कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी विशेष रजा देण्याची योजना सुरू केली आहे. हा अनोखा उपक्रम कर्मचार्‍यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

पोलिसांच्या जीवनातील ताण कमी करण्याचा प्रयत्न

पोलिसांच्या कामाच्या स्वरूपामुळे त्यांना अनियमित वेळापत्रक, ताणतणाव, आणि थकवा याचा सामना करावा लागतो. सतत १२ तासांची ड्युटी, व्हीआयपी बंदोबस्त, यात्रा व्यवस्था, आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी कधीही हजर राहावे लागते. या सर्वांमुळे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील आनंद हरवतो. वाढदिवसाच्या निमित्ताने दिली जाणारी सुट्टी त्यांच्यासाठी नवीन उर्जेचा स्रोत ठरत आहे.

पोलीस आणि कुटुंबीयांमध्ये आनंदाचे क्षण

हा उपक्रम सुरू झाल्यापासून साताऱ्यातील पोलीस कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय आनंदी झाले आहेत. पोलिसांसाठी हा निर्णय तणावमुक्तीचा व सकारात्मक अनुभव ठरला आहे. त्यांच्या कुटुंबीयांना या निर्णयामुळे पोलिसांच्या आयुष्यातील महत्त्वाचा क्षण साजरा करता येत असल्याने त्यांचीही समाधानाची भावना वाढली आहे.

मुख्यमंत्री फडणवीस, मंत्री शिवेंद्रसिंहराजेंच्या निर्णयाचा स्वागतार्ह परिणाम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच घेतलेल्या निर्णयानुसार पोलिसांकडून मानवंदना तसेच स्वागतासाठी आलेल्या अधिकाऱ्यांकडून बुके देण्यावर बंदी घातली आहे. याशिवाय, बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी पोलीस लवाजमा नाकारून सायरन बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयांमुळे पोलिसांच्या कामाचा ताण कमी होत असून, त्यांच्या सेवेत अधिक सुटसुटीतपणा येत आहे.

साताऱ्यातून सुरू झालेला उपक्रम राज्यभर पोहोचावा

पोलिसांच्या तणावपूर्ण जीवनशैलीला थोडासा विराम देणारा सातारा शहर पोलीस ठाण्याचा हा उपक्रम इतर जिल्ह्यांसाठीही प्रेरणादायी ठरावा, अशी अपेक्षा आहे. पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी दाखवलेली संवेदनशीलता आणि कौटुंबिक नात्यांवरील हा भर पोलीस दलात सकारात्मक बदल घडवू शकतो.

पोलिसांच्या जीवनातील आनंदाचा नवा अध्याय

साताऱ्याचा हा उपक्रम केवळ पोलिसांना तणावमुक्त करत नाही, तर त्यांच्या कुटुंबीयांनाही विशेष महत्त्व देतो. हा उपक्रम राज्यभर राबवला गेला तर पोलीस दलाचे मनोबल उंचावेल आणि त्यांना अधिक उत्साहाने सेवा देण्याची प्रेरणा मिळेल.

साताऱ्यातून सुरू झालेला हा बदल देशभरातील पोलीस दलाला नवा मार्ग दाखवणारा ठरावा, अशी जनतेचीही अपेक्षा आहे.

“पोलिसांच्या ताणाला विराम देण्याचा छोटासा प्रयत्न””

पोलीस कर्मचारी दिवसरात्र कर्तव्य बजावत असतात, पण त्यांच्या कुटुंबासाठी वेळ देणे कठीण होते. वाढदिवस हा खास दिवस कुटुंबासोबत साजरा करण्यासाठी आम्ही विशेष रजा उपक्रम सुरू केला आहे. यामुळे पोलिसांचा ताण कमी होईल आणि कामात नवचैतन्य येईल. हा उपक्रम साताऱ्यापुरता मर्यादित न राहता राज्यभर राबवला जावा, असे माझे मत आहे, कारण पोलिसांचे जीवनमान उंचावणे ही केवळ जबाबदारी नसून आमचे कर्तव्य आहे.”

श्री.राजेंद्र मस्के,

वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सातारा शहर, पोलीस ठाणे.

error: Content is protected !!