शुध्द श्वासासाठी सातारकरांची एकजूट

हरित साताराचा ‘नवसंजीवनी’ उपक्रम सुरू; मंगळाई टेकडीवर शेकडो नागरिकांचा सहभाग

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा):”शुध्द श्वासासाठी एकच ध्यास” या संकल्पनेने सातारकरांनी नववर्षाच्या पहिल्या दिवशी अजिंक्यतारा किल्ल्याच्या परिसरात वृक्ष संवर्धनाचा नवकल्पक उपक्रम हाती घेतला. सुमारे शेकडो नागरिकांनी या उपक्रमात सहभाग घेत मंगळाई टेकडीवरील रोपांना पाणी घालून त्यांना नवसंजीवनी दिली. पर्यावरण संरक्षणासाठी एकत्र येत दर शनिवारी एक तास श्रमदान करण्याचा संकल्प यानिमित्ताने करण्यात आला.

वृक्ष संरक्षणाची अनोखी सुरुवात

हरित सातारा ग्रुपच्या पुढाकाराने सुरू झालेल्या या उपक्रमाचा उद्देश शहरीकरणामुळे निर्माण झालेल्या वायूप्रदूषणाशी लढा देण्याचा आहे. वाढती वाहतूक, जमिनीची धूप, बदललेले पर्जन्यमान आणि नष्ट होत चाललेले हरित क्षेत्र यामुळे सातारा शहरातील हवेची गुणवत्ता खालावली आहे. या समस्येवर मात करण्यासाठी वृक्षारोपणाबरोबरच वृक्ष संवर्धन आणि संरक्षण हाच मुख्य उपाय असल्याचे हरित सातारा ग्रुपने अधोरेखित केले.

नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद

अजिंक्यताराच्या मंगळाई टेकडीवरील रोपांना पाणी देण्याचा हा उपक्रम नागरिकांसाठी अनुकरणीय असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. वृक्षारोपण कार्यक्रम अनेक ठिकाणी होतात, परंतु रोपांना पाणी देऊन त्यांच्या संवर्धनासाठी राबवला जाणारा हा उपक्रम नाविन्यपूर्ण असल्याचे गौरवोद्गार काढण्यात आले.

यावेळी माजी नगरसेवक भालचंद्र निकम, इम्तेखाब बागवान, सागर पावशे, भारत भोसले, प्रशांत पोतदार, डॉ. गायकवाड, सागर लोहार, नरेंद्र महाबळेश्वरकर, शुभदा महाबळेश्वरकर यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिक उपस्थित होते.एनसीसीच्या विद्यार्थ्यांसह अनेक स्वयंसेवकांनीही या उपक्रमात हिरीरीने सहभाग घेतला.

सातत्याने उपक्रम राबवण्याचा निर्धार

दर शनिवारी सकाळी सात ते साडेआठ या वेळेत अजिंक्यताराच्या मंगळाई टेकडीवर झाडांना पाणी घालण्याचा उपक्रम जून महिन्यापर्यंत राबवण्यात येणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी श्रमदानात सहभागी होऊन पर्यावरण रक्षणासाठी योगदान द्यावे, असे आवाहन हरित सातारा ग्रुपच्या वतीने करण्यात आले आहे.

“फक्त वृक्ष लावणेच नव्हे, तर त्यांची काळजी घेणे हाच खऱ्या अर्थाने हरित भविष्याचा पाया आहे.” हाच संदेश हरित साताराचा हा उपक्रम देतो

error: Content is protected !!