बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे उपमुख्यमंत्र्यांना निवेदन; स्वच्छता, नदीपात्र सुधारणासह जलशुद्धीकरण प्रकल्पाची मागणी

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा): साताऱ्यातील दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या संगम माहुली तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी बालाजी चॅरिटेबल ट्रस्टने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना निवेदन सादर केले आहे. कृष्णा आणि वेण्णा नद्यांच्या संगमावर वसलेले हे तीर्थक्षेत्र धार्मिक, ऐतिहासिक आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातून महत्त्वाचे असून, सध्या येथे अस्वच्छता, प्रदूषण आणि सुविधांचा अभाव जाणवत आहे. भाविक, पर्यटक आणि स्थानिक नागरिकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असलेल्या या ठिकाणी व्यवस्थापनाचा अभाव असल्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.

बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र चोरगे यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आलेल्या निवेदनात परिसराच्या स्वच्छता आणि सुशोभीकरणासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे. नदीपात्रातील वाढता गाळ, सातारा शहरातून थेट नदीत मिसळणारे सांडपाणी, घाटांची दुरवस्था आणि शेतीचे होणारे नुकसान यामुळे संगम माहुली परिसराची स्थिती गंभीर बनली आहे. यावर तातडीने तोडगा काढण्यासाठी आधुनिक जलशुद्धीकरण प्रकल्प, घाटांचे पुनर्निर्माण, संरक्षण भिंती आणि स्वच्छता मोहीम राबवण्याची आवश्यकता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

संगम माहुली परिसरात काशी विश्वेश्वर आणि रामेश्वर मंदिर यांसह शंभरहून अधिक प्राचीन मंदिरे तसेच श्री. छ. शाहू महाराज आणि श्री.छ.ताराराणी यांची समाधीस्थळे आहेत. त्यामुळे या ठिकाणी धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे. याशिवाय, सातारा शहर व परिसरातील १५ ग्रामपंचायतींमधील नागरिक अंत्यसंस्कार व पारंपरिक विधींसाठी याच परिसरातील कैलास स्मशानभूमीचा वापर करतात. त्यामुळे येथे दररोज ५,००० ते १०,००० नागरिकांची वर्दळ असते. मात्र, स्वच्छतेअभावी आणि प्रदूषणामुळे हा परिसर अत्यंत अस्वच्छ बनला असून, प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

साताऱ्यातील अनेक भागांना या नदीतून पाणीपुरवठा केला जात असल्याने जलप्रदूषणाचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. दूषित पाणी आणि गाळामुळे भविष्यात मोठे पर्यावरणीय संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. सातत्याने बदलणाऱ्या नदीप्रवाहामुळे शेतीचे नुकसान होत असून, प्रवाह नियंत्रित करण्यासाठी काँक्रीटच्या संरक्षण भिंती बांधण्याची मागणीही ट्रस्टने केली आहे. तसेच, ब्रिटीशकालीन जुन्या पुलाच्या शेजारी नवीन पुलाच्या कामाला गती देण्याची आवश्यकता असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

बालाजी चॅरिटेबल ट्रस्टने संगम माहुलीच्या विकासासाठी सातत्याने मागणी केली असून, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पालकमंत्री असताना साताऱ्यात महत्त्वाची विकासकामे केली आहेत. त्यामुळे त्यांनी आता संगम माहुलीच्या विकासासाठी तातडीने ठोस निर्णय घ्यावा, निधी मंजूर करून कामांना गती द्यावी, अशी मागणी ट्रस्टच्या वतीने करण्यात आली आहे.

सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री असताना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी मोठे योगदान दिले आहे. त्यामुळे त्यांनी आता संगम माहुलीच्या विकासासाठी ठोस निर्णय घ्यावा, निधी मंजूर करून कामांना गती द्यावी, अशी आम्ही मागणी करीत आहोत. संगम माहुलीचा विकास हा केवळ धार्मिक पर्यटनासाठी नाही, तर साताऱ्याच्या पर्यावरणीय आणि सामाजिक आरोग्यासाठीही महत्त्वाचा आहे. यासाठी शासनाने त्वरित पावले उचलावीत.
- राजेंद्र चोरगे,संस्थापक, बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट, सातारा.

You must be logged in to post a comment.