झेडपीच्या आरोग्य विभागाची ‘बुद्धी’ भलतीकडे!

उन्हाळा बनला ‘डिझास्टर’; अधिकारी बनले ‘ग्रँडमास्टर’

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : जिल्ह्यात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर उष्माघाताचा धोका दिवसेंदिवस गंभीर बनत असताना, सातारा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील धक्कादायक निष्काळजीपणाचा प्रकार समोर आला आहे. नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी असलेले वैद्यकीय अधिकारीच गुरुवारी (३० एप्रिल) कार्यालयीन वेळेत संगणकावर ‘बुद्धीच्या खेळात’ म्हणजेच बुद्धिबळात गुंतलेले असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

शासनाकडून उष्माघात टाळण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या जात असताना, जिल्हा स्तरावरच अशा प्रकारचा बेफिकीरपणा समोर येणे गंभीर मानले जात आहे. शासकीय संगणक, वीज आणि इंटरनेटचा गैरवापर होत असल्याने नियंत्रण यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

शासकीय कार्यालयांच्या संगणकांवर महत्त्वाची आणि गोपनीय कामे होत असताना, त्याच प्रणालींवर खेळांसारखी ॲप्लिकेशन किंवा सॉफ्टवेअर कसे डाउनलोड होतात, यावर कोणतेही नियंत्रण नाही का, असा सवाल उपस्थित होत आहे. आरोग्य विभागासारख्या संवेदनशील यंत्रणेत अशी शिथिलता भविष्यात गंभीर परिणाम घडवू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

सध्या तापमान ४० अंशांच्या पुढे गेले असून उष्माघाताचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील ८४ प्राथमिक आरोग्य केंद्रे सक्षम ठेवणे, आवश्यक सुविधा आणि मनुष्यबळ उपलब्ध करून देणे ही विभागाची प्राथमिक जबाबदारी आहे. मात्र प्रत्यक्षात अधिकाऱ्यांचे ‘गांभीर्य’ काय आहे, हेच या प्रकारातून स्पष्ट होत आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील आरोग्याची जबाबदारी असलेल्या विभागातच असा निष्काळजीपणा दिसून आल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई होणार आणि भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कोणती ठोस पावले उचलली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!